Apr 15, 2015

कवीनं लिहू नयेत कविता

कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !

कवीनं लिहावं
उमलणाऱ्या कळीवर
गालावरच्या खळीवर !
फुलावर  पानावर … काळ्या रानावर.
खूपच दाटून आलं तर  
येणाऱ्या, नयेणाऱ्या पावसावर
एखाद्या निस्तेज दिवसावर.

कवीनं लिहावं स्वतःवर
स्वतःच्या हातावर.
खोलवर मातीत शिरून
मातीची कूस उजवनाऱ्या
नांगराच्या दातावर

खूपच भरून आलं तर ….
खोदत बसावा भूतकाळ,
ओढत राहावं वर्तमान ….
अन नोंदवून ठेवावं आपणच न पाहिलेलं भविष्य
आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून.

कवीनं लिहावं ….
वैष्णवांच्या दिंडीवर
माणसांच्या झुंडीवर
अन खूपच असह्यच झालं तर
बुधवार पेठेतल्या रंडीवर.
.
.  
भांडवलदारांच्या सुबत्तेवरही लिहू शकतो कवी
अंगठा बहाद्दरांच्या गुणवत्तेवरही लिहू शकतो कवी
इतकंच काय तर …
सध्य-परीस्थीती अन वर्तमानाचं भान म्हणून …
शेतकऱ्याच्या आत्महत्तेवरही लिहू शकतो कवी !
.
.
मतदानाच कर्तव्य म्हणून
एकदा बटन दाबून निर्धास्त व्हावं कवीनं
होवू द्यावेत देशाचे हाल …
पाहत राहावा जाती धर्माच्या नावाने चाललेला
स्वार्थाचा बाजार.
विसरून जावी शब्दांची भाषा,
विसरून जावा शब्दांनी युद्धे जिंकल्याचा इतिहास !
.
.
कवीनं जपावं आपल्या शब्दांना …
अभिजात मराठीच्या कोंदणात…,
अन झुलत राहावं शासन पुरस्कृत
साहित्य संमेलनाच्या मांडवाखालून.
पण ….
कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !



- रमेश ठोंबरे

Mar 6, 2015

दैनंदिनी (महिला दिन)



एकीवर बलात्कार
एकीचा खून ...
एक फारच अबला
मेली आपणहून ...!

गावातली सरपंच
उंबऱ्याच्या आत ...,
कारभार पाहतात,
पदाचे नाथ ... !

काळाची गरज,
महिला आरक्षण
आरक्षित शीटाचे
जन्मापासून भक्षण !

सासरचा जाच
कोरडी विहीर
महिला दिनी
सफल वीर ...!

वर्तमान पत्रातले
आजचे वर्तमान
दैनंदिनीत
तेवढेच ज्ञान !

- रमेश ठोंबरे
08/03/2010

वरील ओळीत कुठेच काव्य नाही असा आरोप होऊ शकतो ...!
कुणाला अढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
...... कारण वरील ओळी देशाच्या  दैनंदिनीतून साभार घेतल्या आहेत.
(सोमवार, दी. ०८/०३/२०१०)

Feb 21, 2015

बापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत


बापू
तुमचा जन्मदिन आम्ही मर्यादित ठेवला
सरकारी कार्यालयापुरता  ….
अन सामाजिक भान म्हणून ….
'राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन !'
म्हणत वर्तमान पत्रातील एका कोपऱ्यापुरता.

आम्ही तो रुजू दिला नाही जनमानसात.
कारण …
मग त्याचा झाला असता उत्सव.
… तुमच्या प्रतिमेला हार घालून ….
निघाल्या असत्या चौका-चौकातून मिरवणुका.
'ड्राय डे' दिवशीही झींगली असती तरुणाई.

डीजे वर वाजणाऱ्या 'चिकण्या चमेलीवर'
तर्राट झुंडीन धरला असता ताल .
अन मुजोर वादळात उडाला असता कुणाशीचा झगा
तुमच्याच मिरवणुकीत तुमच्या समोर !

बापू
आमचे आभार माना
खंत करू नकात,
'सरकारी भिंतींशिवाय, कोणीही तुमच्या पाठीशी नसल्याची'
हरिजन, गिरीजन, बहुजनाच्या देवासारखे
कोण्या एकट्याचे नाही आहात तुम्ही !
 
आम्ही, तुम्हाला म्हणतो,  
बापू, राष्ट्रपिता अन महात्माही,
पण देवत्व कधीच बहाल केलं नाही तुम्हाला
कारण तुम्हाला देव्हाऱ्यात बसवलं असतं तर
मग आशाचं मावल्या असत्या
पुन्हा 'गांधी' जन्माला घालण्याच्या !

बापू
तुम्ही आमच्यासाठी सामान्य
म्हणूनच आम्ही दाखवू शकतो तुमचे दोष,
काढू शकतो तुमच्या शिकवणीतील उणीवा
कट्ट्यावर बसून देवू शकतो शिव्या
अन अहिंसा शिकवणाऱ्या कृश देहावर …
झाडू शकतो गोळ्याही बिनधास्त  !
. .
. .
. .
. .
. .
आम्ही होवू दिले नाहीत जयंतीचे उत्सव …
आम्ही बहाल केलं नाही तुम्हाला देवत्व,
आम्ही गोळ्या घालूनही जिवंत ठेवले तुमचे विचार ….
म्हणून ……
बापू
तुम्ही आमचे आभार मानायला हवेत !

- रमेश ठोंबरे