Nov 6, 2013

अभिव्यक्ती


एक कवी,
त्याच्याच ए. सी. केबिन मध्ये बसून 
लिहितो त्याच्या गावाच्या 'दुष्काळाची एक कविता'
इतकी खोल, इतकी विदारक कि,
वाचताना वाचकाच्या मनात शिरते आर पार … 
आणि पिळवटून टाकते त्याचं काळीज. 
त्याला आठवतो त्याने मागे सोडलेला त्याचा गाव. 

तो उभा राहतो …. 
कवितेतील त्या नायकाच्या जागी … 
आणि आठवू पाहतो त्याचा भूतकाळ …
त्याला दिसू लागते चुलीसमोर फुकणी फुकत 
बसलेली त्याची माय…
तिच्या डोईवर नावापुरताच उरलेला 
जीर्ण साडीचा फाटका पदर …
सभोवताली काळवंडलेल्या घराच्या भिंती… 
घामानं मळकटलेली बापाची 
कधी काळी पांढरी असलेली टोपी. 

टोपीवरून आठवतो … त्याला त्याचा बाप … 
दिवस उगवायच्या आत, 
खायला एक तोंड कमी म्हणून फोडलेल्या बैलजोडीतील 
एक बैलासह निघायचा शेतावर. 
दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःलाच जुंपायचा …
अन कधी त्याच्या मायलाबी. 
तेंव्हा मायला म्हणायचा, 

"औंदा पिक चांगलं आलं की 
माह्या सोन्याला जोडी बी आणील आन तुला नवी साडी बी"
मायला धीर यायचा, अन 
माय बैलाच्या बरोबरीन ओत्त ओढायची !
आणखी पुढ वाचल्यावर त्याला आठवतो … 
याही वर्षी कोरडाच गेलेला पावसाळा,
दावण रिकामी करून डोक्याला हात लावून बसलेला बाप.
पुन्हा आठवायची फुकणी फुकणारी माय,
आणि किती तरी वेळ नुस्तच उकळणार चुलीवरच पाणी. 

आता तो कविता वाचतच नाही …
कारण त्याच्या डोळ्यासमोर येत परसातलं भलं थोरलं झाड … 
जिथं बापानं माहेरपणाला आलेल्या लेकीच्या पहिल्या पंचमीला 
बांधला होता हौसेन तिच्यासाठी झोका …. 
आज आठवतोय त्याला, त्याच झाडावर …. 
कदाचित त्याचं फांदीला
आणि कदाचित त्याचं दोरीवर 
लटकणारा बाप !

कविता पुढं न वाचताच तो पुस्तक खाली ठेवतो 
आणि सलाम करतो, त्या कवीला आणि 
कवीच्या त्या अभिव्यक्तीला !
आणि लिहितो एक अभिप्राय, 
कविता काळजापर्यंत पोचल्याचा !

तेंव्हा खुश होतो कवी …
स्वतःच्या कलाकृतीवर, 
आणि वाचकाच्या अभिव्यक्तीवर !

रमेश ठोंबरे
............................................................................................................................................................
मराठी कविता समूहाच्या 'कविता विश्व' दिवाळी अंकातील माझी कविता …. 
'मराठी कविता समूहा'च्या दिवाळी अंकाचे चे ३ रे वर्ष …. आजही आठवतंय …. दोन वर्षांपूर्वी, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे (जानेवारीत सासवड येथे होणाऱ्या) नियोजित अध्यक्ष कविवर्य फ़. मुं. शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेत करण्यात आले होते. 

No comments:

Post a Comment