Feb 28, 2014

…. शोध ….


मी शोधत असतो भूतकाळातले संदर्भ 
मी तपासात असतो वर्तमानातील नोंदी 
मला खुणावतात उत्खनन न होऊ शकलेल्या 
कित्तेक वर्षापासून भूगर्भात आपलं,
अस्तित्व हरवून आणि रहस्य दडवून असलेल्या वास्तू
माझ्याकडे आशेनं पाहतात विद्रोह मांडू न शकलेल्या
माझ्याच घरातील कित्तेक अबोल वस्तू.

तसा मीही शोधतच असतो विसंगतीना सामोरं जाणारं उपेक्षित जग
कित्तेक वर्षांपासून पेटून उठण्यासाठी बेमालूमपणे
धुमसत राहणाऱ्या काळजातली धग.

मला काढावी वाटतात जळमटं,
मला तोडाव्या वाटतात बेड्या,
मला फोडाव्या वाटतात भिंती विद्रोहाला बंदिस्त करू पाहणाऱ्या.

मी शोधत असतो टेकू लावण्यासाठी प्रथ्वी बाहेरची एक जागा,
जिथं उभं राहून मी हलवू शकेल हे निद्रस्त जग.

हे सगळं शोधत असतानाच मी हरवून जातो स्वतः ला,
कारण मला माहित आहे, मी स्वतः हरवलो की,
सुरु होतो पुन्हा नव्याने शोध !
मी शोधू लागतो भूतकाळातले संदर्भ
मी तपासू लागतो वर्तमानातील नोंदी !

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment