Jun 15, 2014

फक्त एवढे कराल का ?असाल सेवक जनतेचे तर फक्त एवढे कराल का 
सत्तेसाठी सोडून थोडे सत्यासाठी लढाल का ?


बांधावरती भाव लावता शेतकऱ्याच्या कष्टाचा 
शेतामध्ये उतरून थोडा नांगर हाती धराल का ?


जुनेच खड्डे, जुनीच रोपे, वृक्षारोपण खेळ जुना 
या वर्षीचे वृक्ष लावण्या नवीन जागा पहाल का ?


साक्षर करण्या जनता, तुम्हा शिक्षण खाते दिलेच तर
इयत्ता चौथी पास कराया बाकावरती बसाल का ?


सत्ता पडता झोळीमध्ये विसरून जाता जनतेला
बाप कधी जर समोर आला ओळख देवून हसाल का ?


आवडतो जर फक्त तुम्हाला, फोटो, ब्यानर अन सत्कार !
हार घालतो हजार आम्ही, फोटो पुरते उराल का ?


- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment