Jul 30, 2014

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
हे शहर सुस्तावलकी,
मला आठवते गावाकडची ….
पहिल्या पावसातली लगबग.

शहरातले रस्ते पावसात निर्जन झालेले असतात
अन गावाकडचे रस्ते
ओसंडून वाहत असतात,
पहिल्या पावसाने सुखावलेल्या उत्साही मनासकट !

शहरातल्या रस्त्यांवर उडत राहतात
नव्या कोऱ्या कडक इस्त्रीला डागाळणारे शिंतोडे
अन गावच्या चिकनमातीत रुतत जातात
गुडघ्यापर्यंत पाय विनातक्रार.

शहराला कौतुक  ….
डांबरी रस्ते भिजवणाऱ्या स्वच्छ पावसाचं
अन गावाला आस
बांध फोडून वाहणाऱ्या मातीमिश्रीत गढूळ पाण्याची.

शहरातल्या नाल्यात
गुदमरतो पाण्याचा जीव
अन गावच्या नदीत मोकळे होतात
निपचित पडलेले अगणित श्वास

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
गोठ्लेल्या मनाला फुटू लागतात घुमारे
अन विद्रोही मन भटकत राहत एकटच माळरानावर ….
द्विधेत असलेल्या शरीराशिवाय
निस्संकोच   !

- रमेश ठोंबरे








 




   

No comments:

Post a Comment