Mar 20, 2014

....


परीक्षा नळीतला का होतो कलर गुलाबी ?
श्वासातुनी प्रियेच्या भिनते जहर गुलाबी 

स्वतः शिकारीच येथे झालेत जायबंदी 
येथील पाखरांची आहे नजर गुलाबी

पाठीत वार त्याने हे जानुनीच केला
प्रेमात पोळलेले असते जिगर गुलाबी

मी बोलतोय त्याची खात्री मलाच नसते
ओठावरून जेंव्हा फिरते अधर गुलाबी

येथे वसंत फुलतो, र्हदयात बारमाही
शहरातल्या ऋतूंचा असतो बहर गुलाबी

तो वारला तरी पण आशा जिवंत होती
सरनावरीच त्याच्या आली खबर गुलाबी

- रमेश ठोंबरे
9823195889

Mar 19, 2014

सायेब

"सायेब,
येळात येळ काढून, 
मोडक्या तोडक्या बैलगाडीत बसून… 
अख्या पानंदीचा चिखुल तुडवीत,
तुम्ही माझ्या वावरात आलात…
कालपस्तोर, पोटाला चिमटी काढून अन
डोळ्यात तेल घालून जोपलेल्या माझ्या
मोसंबीच्या झाडांना वावरात आडवं बघून
मटकन खाली बसलात.
चिकण्या मातीच्या चिखलानं तुमचं बुड माखून गेलं"

"सायेब
पांढऱ्या शुभ्र खादीला जवा मातीचं रंग आलं,
तुमचं माझं दु:खं सायेब एक झालं"

"डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं,
सायेब, गारपिटीन सारं जगणं झोडपून नेलं
सायेब माझं दु:खं तुम्हींच चांगलं मांडू शकाल ,
माझ्या वतीनं तुम्ही तुम्ह्च्या सायबाला भांडू शकाल."

पुढलं एका, लोकहो !
"म्या जवा वाकल्याल्या झाडाच्या मोसंबीला हात घातलं,
तवा ढुंगण झाडत सायेब पटकन चिखलातनं उटलं."
म्हणलं, "नगं नगं पांडबा, मला काहीचं नसू दे !,
पुढच्या महिन्यात इलेक्शन, 'तवा लक्ष असू दे !', "

- रमेश ठोंबरे
9823195889

Mar 14, 2014

असं दु:ख अवकाळी



असं दु:ख अवकाळी
त्याले वखुत कळना
भर उनाळ्यात देवा
त्याले सुटलाय पान्हा

आस पावसाची होती
तवां उडाला फुफाटा 
झाले अनवाणी पाय 
साऱ्या भेगाळल्या वाटा

बीज रुजायाचे तवा
नाही थेंब ओला दिला
हाता तोंडाशी आलेला
घास पावसानं नेला

असं फाटलं आभाळ
जसं फाटलेलं ऊर 
कसं कोणत्या दु:खाच 
सांग मातलं काहूर ?

अरे आभाळाच्या देवा
कसा झालास दगड
जिनं वावहून गेलं
आता आवर पाझर

माझ्या आभाळाच्या देवा
आता थांबव आबाळ
पुन्हा रुजाया राहू दे .
माझ्या पायामध्ये बळ

- रमेश ठोंबरे