Mar 14, 2014

असं दु:ख अवकाळी



असं दु:ख अवकाळी
त्याले वखुत कळना
भर उनाळ्यात देवा
त्याले सुटलाय पान्हा

आस पावसाची होती
तवां उडाला फुफाटा 
झाले अनवाणी पाय 
साऱ्या भेगाळल्या वाटा

बीज रुजायाचे तवा
नाही थेंब ओला दिला
हाता तोंडाशी आलेला
घास पावसानं नेला

असं फाटलं आभाळ
जसं फाटलेलं ऊर 
कसं कोणत्या दु:खाच 
सांग मातलं काहूर ?

अरे आभाळाच्या देवा
कसा झालास दगड
जिनं वावहून गेलं
आता आवर पाझर

माझ्या आभाळाच्या देवा
आता थांबव आबाळ
पुन्हा रुजाया राहू दे .
माझ्या पायामध्ये बळ

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment