Jul 12, 2011

|| तन हे मृदंग ||


तन हे मृदंग,
मन हे पंढरी |
टाळ नाद करी
विठ्ठलाचा ||१||

विठ्ठल -विठ्ठल,
लागलीची गोडी |
सोडीयली होडी,
चान्द्रभागी ||२||

आजचा हि दिन,
नाही मज रिता |
अडलो पुरता,
प्रपंचात ||३||

आठवण येता,
सैर-भैर मन |
शोधीतसे धन
सावळ्याचे ||४||

भेटीसाठी मन,
आतुरले खूप |
पाहिले ते रूप,
देव्हा-यात ||५||

- रमेश ठोंबरे

Jul 8, 2011

|| नाम महिमा ||


हरी नाम घ्या रे
मनाने निर्मल
येईलकी बळ
साधनेला ||१ ||

हरी नाम शांत
हरी नाम गोड
हरी नाम जोड
अध्यात्माची || २||

हरी मुखे म्हणा,
पुण्या होई खास
मोजता का श्वास
घेतलेला ||३||

हरी हरी केले
लाऊन समाधी
उरली न व्याधी
आता काही ||४||

नामाचा महिमा,
सांगतो रमेश
नाम व्हावा श्वास
शेवटाचा ||५||

- रमेश ठोंबरे

|| सावळे हे रूप ||


सावळे हे रूप
वेड मज लावी
आता भेट व्हावी
सावळ्याची || १ ||

भेटीसाठी जीव
कासावीस झाला
करीतसे धावा
विठ्ठलाचा || २ ||

दर्शन ते व्हावे
ध्यास मनी आहे
नीज रूप पाहे
पांडुरंगे || ३ ||

प्रेम हे अमाप
भक्तावरी तुझे
हवे काय दुजे
माउलीगे || ४ ||

विठू विठू बोलू
आनंदाने डोलू
भेटेल कृपाळू
मायबाप || ५ ||


- रमेश ठोंबरे