May 30, 2011

रे सख्या, मी चिंब भिजले रे ....


रे सख्या, मी चिंब भिजले रे ....
तू बोललास काही अन ... जीवन सजले रे.

हि धुंद झाली हवा ....
हा पाऊस वाटे नवा,
ओले हे अंग असे
अन नजरेचा गोडवा.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

मन माझे अधीर होते,
हि आसुसलेली काया ...
तू आलास घेऊन धुंदी
अन ओली-ओली माया.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

घे समजून घे सख्या,
या धरतीची याचना ....
कर शिडकाव सरींचा
बघ दाटल्या भावना !
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

व्यापून आयुष्य माझे
तू बोलतोस काही ...
तू प्रश्न टाकला ऐसा
कि उत्तर ...गंध होई..
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

- रमेश ठोंबरे
३० मे २०११

May 28, 2011

~ अजून बाकी ~


धुंद जाहली, कुंद जाहली, परी भाळणे अजून बाकी
चिंब जाहलो आठवणींनी, पाउस भिजणे अजून बाकी.


रक्त सांडले दुबळ्यांचे अन, जीवे मारले रक्षणकर्त्या
देश आमुचा पोसत बसतो, फास अवळणे अजून बाकी.


उंच उंच इमले, आदर्शाचे, पचउन कुठला ढेकर येतो
आगडोंब ज्या उदरी वसतो, घास भरवणे अजून बाकी.


तुझे दिलासे, तुझे उसासे, तुझे खुलासे मोजत बसतो
पहिल्या वहिल्या पत्राचे पण, उत्तर मिळणे अजून बाकी.


भाव भुकेला विठू एकटा, वाट पाहतो भक्तगणांची
दलाल दिसले, बडवे दिसले, विठ्ठल दिसणे अजून बाकी.


रदीफ सारे जुळून येता, किती रमेशा गजला लिहिल्या
काळीज पार करणारा एक, शेर गिरवणे अजून बाकी.



- रमेश ठोंबरे

May 27, 2011

१६. || प्रियेचा तो बाप ||


पाहिला मी आज
प्रियेचा तो बाप
सर्वांगाला काप
सुटला हो || १ ||

अंगी तो धिप्पाड
झोकात चालतो
नाकात बोलतो
काही बाही || २ ||

पिंजारून आल्या
ओठावरी मिशा
दिसतील कशा ?
साळसूद || ३ ||

दुसर्याच क्षणी
माझ्यापुढे उभा
केला मग तोबा
ऐश्या नरा || ४ ||

कुठे मम प्रिया
कुठे तिची नाळ
पाहील मी कुळ
मातेचेही || ५ ||

- रमेश ठोंबरे
दि २१ नोव्हे. २००९