Oct 27, 2013

तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …


तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 
घाई करू नकोस, 
कुठल्याही निष्कर्षाला पोहचण्याची …
जगण्याचा वेग थोडा मंद कर … 
धावू नकोस नुसताच … 
जगून घे !

कुठल्याच गोष्टी नसतात अंतिम सत्य …
त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून स्वीकारायचं, 
अन मला पटत नाही म्हणून नाकारायचं. 
याला काय म्हणायचं ? 

घाई करू नकोस, 
अनुभवाच्या कसोटीवर घासून घे 
तुझ्या सद्सद विवेक बुद्धीने तपासून घे !

मन सुद्धा बोलतं कधी कधी सत्य,
त्यात हि मानत जा तथ्य !
मात्र त्याच्यावर हवा थोडा लगाम …
कारण थोडी मोकळीक दिलीस तर धावेल बेफाम !
मन कधी आपलं तर … कधी परकं,
कधी देतं साथ तर कधी लाथ हि !

म्हणून थोडा वेळ जावू दे … 
घाई करून नकोस … सबुरीने घे !
कारण कधी कधी आपण ज्याला अंतिम सत्य मानतो …
त्यात होत असतात बदल,
नवी दिशा मिळाली कि, 
बदलतात व्याख्या 
बदलतात संदर्भ 
बदलतात विचार ! 
म्हणून थोडा वेळ दे …
तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 

- रमेश ठोंबरे 
www.rameshthombre.com

Oct 26, 2013

किती जाळला



किती जाळला जीव तुझ्यावर ? 
आठवतो मी तू गेल्यावर 

तीट लाव तू नजरेसाठी 
नको भरोसा या डोळ्यावर

सुखात ती तर, सुखी असू दे
पाठीवरती घाव दिल्यावर

जगणे माझे तरून जाईल
आठवणींच्या हिंदोळ्यावर

असे कसे रे प्रेम रमेशा ?
संपून गेले उलगडल्यावर

- रमेश ठोंबरे
.....................................

बोलू नकोस आता काही
ओठावरती ओठ दिल्यावर !
................................... 

Oct 17, 2013

दुष्काळ


दुष्काळ दाटलेला
डोळ्यात साठलेला
आधीच बाप माझा
काळीज फाटलेला.

मातीत राबताना
घमास सांडताना
व्याकूळ रोज होतो
देवास भांडताना

स्वप्नात रोज त्याच्या
येतात टोळ धाडी
पाण्याविनाच डुबते
आकंठ रोज होडी

पाऊस आज यावा
करतोय रोज धावा
वर्षे अनेक सरली
कोणास दोष द्यावा

आभाळ रंग दावी
अध्यात्म आस लावी
अभंग भंगलेला
अन कोरडीच ओवी

मातीत राबताना
डोळ्यास भावलेला,  
दिसतोय बाप माझा
गळफास लावलेला !

- रमेश ठोंबरे