Oct 17, 2013

दुष्काळ


दुष्काळ दाटलेला
डोळ्यात साठलेला
आधीच बाप माझा
काळीज फाटलेला.

मातीत राबताना
घमास सांडताना
व्याकूळ रोज होतो
देवास भांडताना

स्वप्नात रोज त्याच्या
येतात टोळ धाडी
पाण्याविनाच डुबते
आकंठ रोज होडी

पाऊस आज यावा
करतोय रोज धावा
वर्षे अनेक सरली
कोणास दोष द्यावा

आभाळ रंग दावी
अध्यात्म आस लावी
अभंग भंगलेला
अन कोरडीच ओवी

मातीत राबताना
डोळ्यास भावलेला,  
दिसतोय बाप माझा
गळफास लावलेला !

- रमेश ठोंबरे



No comments:

Post a Comment