Apr 5, 2016

ओढून सावल्या दाट

ओढून सावल्या दाट
ही शांत झोपली रात
पानांची सळसळ चाले
अंधार गर्द घनदाट

आवाज येतसे दूर
की रातकिड्यांचा सूर
मन आशेची हुरहूर
मन शंकांचे काहूर

घन काळ्या अंधारात
चांदणे पहुडले शांत
ही चंद्रकोर साक्षीला
मन भरल्या अंधारात

कल्लोळ मातला आत
हा 'हवा घालतो' वात
चुकलेला प्रवास आहे
थकलेला झंझावात !


- रमेश ठोंबरे 

Mar 30, 2016

माती


वर्षभरानं कधीकाळी
मी शहरातून माझ्या गावात येतो तेंव्हा,
भिरकावून देतो पायांना बंदीस्त करणारे शूज,
श्वास दडपून टाकणार्या स्वाक्ससह
अन सताड उघड्या पायांनी....
फिरून घेतो अक्खा माळरान.
इथल्या मातीच्या ढेकळांनी
सोलवटून घेतो माझे पाय.
.....
.....
कधीकाळी मातीतून जन्मलेला हा देह
पुढं कधीतरी मातीत मिसळताना...
या मातीलाच परका वाटू नये म्हणून !
- रमेश ठोंबरे

Nov 28, 2015

वगेरे


.
असू दे जरा आवर्षण वगेरे 
नको रोज देवूस दर्शन वगेरे
.
तुझी ओढ केवळ विजातीयतेची
धृवाचे - धृवाशी आकर्षण वगेरे
.
नको जवळ येवूस कक्षेत माझ्या
पुन्हा होत जाईल घर्षण वगेरे
.
मला पाहिजे चेहरा सोवळ्याचा
नको रोज भरवू प्रदर्शन वगेरे
.
सुटेना मला संग यत्ने करुनी
तुझे फार गुरुत्वाकर्षण वगेरे !
.
- रमेश ठोंबरे