Nov 24, 2012

अंधाराची साथ


अंधाराची साथ तिला, अंधाराचा ध्यास,
तिमिराचा भास झाला, काळोखाचा श्वास.

आवसेची वाट पाहे, पौर्णिमेची भीती
चढणीला रेंगाळली, अस्तापायी गती

अंधाराच नातं तिला, देवाजीनं दिलं,
दुनियेत आली अन, अंधारून आलं.

काजळल्या पापण्यांनी, डोळे केले बंद
काळ्याशार नयनांना, काजळाचा छंद.

खोल खोल विचारांची, मनामंदी दाटी
उजाडल्या अंतरात, काळजाची खोटी

अस काय उजेडाचं, अडलेलं माप ?
प्रकाशात केलं कोण्या, जनमाचं पाप !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

‎'मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता -

No comments:

Post a Comment