Sep 24, 2013

मनमौजी



आकाशाची छत्री करतो, गातो गाणी 
रस्त्याने तो चालत असतो उडवत पाणी 
कुठे जायचे, काय खायचे, नसते चिंता
डोक्यामध्ये नसते काही, नसतो गुंता !

पाठीवरती घेतो काही, भटकत फिरतो
त्यात कधी तो झाडांसाठी पाणी भरतो
पाहाल तर सोडून दावी ते नेटाने
आणले म्हणतो पक्षांसाठी चारच दाने !

वाट चालते त्याच्यासंगे मार्गक्रमाया
अन वाऱ्याशी सख्य जमवले, दिशा ठरवण्या
थकल्यावरती तरु पाहुनी अडवा होतो
डोक्याखाली दगड घेवूनी झोपी जातो !

घड्याळ म्हणजे, त्याला काही माहित नसते
त्याच्या लेखी जे सगळे ते 'त्याचे' असते.
तुला पाहिजे ? घेवून जा तू तुझेच आहे
मला पाहिजे त्याची चिंता 'त्याला' आहे !

अंतरात माझ्या लपून बसला आहे कुणी
त्याची न माझी ओळख बहुदा आहे जुनी
नाव पुसता हसतो नुसता एकांडा फौजी
मी हसतो, मनात म्हणतो, "आहे मनमौजी !"

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment