Apr 2, 2014

>>>

>>>

गाठण्यास लक्ष 
उभारली गुढी 
हातामध्ये घडी
बांधलेली ।।१।। 

जपतात सारे 
नमो नमो मंत्र 
धनुष्याचे तंत्र 
विसरले ।।२।।

महायुती साठी
समतेचा पूर
इंजिनाचा धूर
दूर दूर ।।३।।

शब्द बाण ओठी
घेवूनी चौकात
काढिती औकात
स्वकीयांची ।।४।।

'आप'ल्या हातात
घेवूनीया झाडू
कॉर्पोरेट लाडू
बोलू लागे ।।५।।

टाकतात धाडी
खादितले टोळ
बोलेरोची धूळ
खेडो पाडी ।।६।।

उघडूच नये
अपेक्षांची मुठ
धोंड्या परी विठ
मऊ म्हणा ।।७।।

परिवर्तन हे
घडायास हवे
पक्षी यावे नवे
घरट्यात ।।८।।

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment