Apr 21, 2014

जगण्याची तगमग


दिस उदास उदास, उभा पेटलेला माळ
भुई वाटते उजाड, जसं रांडवेच भाळ
उन तापून तापून, झालं शिवार भकास 
दूर डोंगराच्या आड, कोणी पेटविला जाळ ?

अनवाणी पावलाची, कोण चढते डोंगर
पोर चाले झपाझप, डोई फुटकी घागर
उन तापल्या देहाला, थेंब पाण्याचा पाझर
धापापल्या काळजाची, लाज राखतो पदर

कोण्या गावचं पाखरू, कोण्या झाडावर आलं
थेंबभर पाण्यासाठी, असं परदेशी झालं
चिमण्यांची चिव-चिव, कावळ्याची काव-काव
चोच कोरडी उपाशी, गाणं विसरून गेलं

पोट खपाटीला गेलं, एक हपापल श्वान
चतकोर भुकेसाठी, त्यान 'एक केलं रान'
धाव धावून थकलं, माणसांच्या जागलीत
जीभ बाहेर तोंडाच्या, देहा लटकली मान

झळा उन्हाच्या पेटल्या, जशी पेटलेली आग
दिस कलत चालला, तरी ओसरेना धग
धनी वावराचा राबे, उन्हा तान्हात, रानात
दिसागानिक वाढते, जगण्याची तगमग !

- रमेश ठोंबरे
9823195889

No comments:

Post a Comment