May 7, 2014

- आभाळ फाटल्याची गोष्ट -


मी माझ्या आज्या पंज्याकडून 
अन त्यांनी त्यांच्या सात पिढ्यानकडून ऐकलीय
आभाळ फाटल्याची गोष्ट 
दावणीला बांधलेलं माणसाचं जगणं …. 
खुंटीला अडकवून ठेवलेलं भविष्य, 
अन रांगेत उभे असलेले अगणित, अनपेक्षित भोग.

हे सगळं सोबत घेवून जगत राहिलेत माझे पूर्वज 
संकल्प पूर्तीच्या स्वप्नाच्या बळावर
त्यांनी वेळोवेळी केलेले कितीतरी संकल्प
अधुरेच आहेत वर्षानुवर्षापासून ….

मी कधी भूतकाळात शिरलो कि,
तपासून पाहतो माझ्या पूर्वजांच जगणं
अधुऱ्या संकल्पांच्या डायरीची फडफडणारी असंख्य पानं
मी जवळ गेलो कि जखडून टाकतात मला त्यांच्या भूतकाळात,
मला जाणवू लागतं त्याचं उपेक्षित जग
त्यांच्या मनातली तगमग.

अन ते पुन्हा सांगू लागतात,
कधी ओलावा आटल्याची गोष्ट
तर कधी 'आभाळ फाटल्याची गोष्ट'

- रमेश ठोंबरे 

9823195889

No comments:

Post a Comment