Aug 18, 2014

स्वप्नातला भारतबापू,
काल गेलो होतो नेहमीप्रमाणं एका सरकारी कार्यालयात, 
तेंव्हा स्वागताला उभ्या प्युनला पाहून
चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. 
त्याचं नेहमीचं बेरकी हास्य आज निरागस झालं होतं. 
त्यानं ओळखीनं माझं हसून स्वागत केलं होतं. 

आत गेलो तर अजबच … 
अगदी बरोबर १० वाजताच सगळे कर्मचारी 
आपापल्या टेबलवर हजार होते. 
नेहमी फाईल मध्ये तोंड लपवणारे सगळे 
स्वतःहून समोर येत होते. 
"आपल्याच सेवेत हजर आहोत" 
असा संदेश त्यांचे चेहरे देत होते. 

'चौकशीच्या' खिडकीवरचे वातावरण पाहून तर गहिवर आला, 
नेहमी हिडीस फिडीस करणाऱ्या चेहऱ्याने जेंव्हा कहर केला !
म्हणाला "मी आपली काय सेवा करू शकतो ?
एखाद काम सांगितलत तर मी नक्किच लकी ठरू शकतो !"

ज्याला त्याला चढलेलं स्फुरण होतं, 
कार्यालयात अगदी चैतन्याचं वातावरण होतं. 

हवा तो कर्मचारी त्याच्याच जाग्यावर असणं, 
त्याची नजर आपल्यावर असणं, 
चुटकीसरशी फाईलच सापडणं,
लंच ब्रेकच्या आधी तिच्यावर संस्कार, सोपस्कार होणं,
मोठ्या साहेबाचं अप्रुवल येणं, 
बड्या साहेबाची सही होणं,
त्याने हसत मुखानं अगदी घरच्या सारखी चौकशी करणं, 
जाताना 'या' म्हणून निरोप देणं !

अगदीच गहिवर आला बापू, 
सगळंच कसं स्वप्नवत ! 

बापू आत्मविश्वासानं म्हणाले, 
"अरे त्यात काय एवढं …. हेच तर माझं स्वप्न होतं, 
आज स्वप्नातला भारत सत्यात आलाय" 

तर मित्र म्हणाला … 
असं काही नाही बापू, 
"कालपासून देशात भ्रष्टाचार 'लीगल' झालाय !" 


- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment