Jan 30, 2015

सगळे सगळे बोलतात ….

सगळे सगळे बोलतात ….
सालं ऐकत कोणीच नाही !

जन्माला येताच रडायला लागतं बाळ !
भूक लागल्या ओठांना विद्रोह शिकवावा लागत नाही,
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

तोंडपट्टा सुरु असतो ज्याचा त्याचा येथे
कोणी उपदेश, कोणी संदेश, कोणी प्रबोधन करत असतो
कोणी इतका हावरट, कोणी इतका चिवट,
राशनच्या रांगेसमोर भाषण मारत असतो !
बोलणाराच खरच का, बोलल्या शिवाय भागत नाही ?
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

'मेरी सुनो' म्हणत कोणी आत्मप्रोढी झाडतो,
'अंतिम सत्य' म्हणत कोणी तत्वज्ञान झोडतो.
स्वभावाचा विनयभंग अन कानावरती बलात्कार,
ऐकणार्याच्या सहनशीलतेचे सगळे रेकॉर्ड मोडतो !
शेवटी गणित शुन्य अन बोलण्याचाही थांग लागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

याची मागणी, त्याचं धोरण, आंदोलनांचा रेटा
जाळ -पोळ,  रास्ता रोको, उपोषणाचा गोल गोटा
'ऐक ऐक' म्हणून हि जर ऐकलं नाही कोणी ….
ऐकत नाही त्याच्या खिशात, मग हजार गांधी नोटा
'तोंडावरती बोट' असं कोणीच वागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !
   
शिक्षणाची डिग्री घेवून दारोदार फिरतो,
'माझं ऐका' म्हणत कोणी आत्महत्या करतो.
ऐकण्यासाठी पाठवलेला …. गोल गोल बोलतो
सरते शेवटी मिळेल त्याच्या दावणीवरती चरतो.
एवढं होऊन सुद्धा कोणी शब्दाला जागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

कानावरती हात ठेवून तोंड सताड उघडं
बोल बोल बोलणारचं भविष्य किती नागडं
'आधी करा … नंतर बोला' दाखवून गेलात तुम्ही
गांधी बाबा, तरी सुद्धा सुटलं नाही तागडं
हातात चरखा घेवून कोणी बडबड त्यागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !      

- रमेश ठोंबरे 

1 comment:

  1. nice article ....
    Submit your blog in our blog directory 4 more visitors
    www.blogdhamal.com

    ReplyDelete