Aug 15, 2018

ओल

सगळं उन्हाळी काम यंदा ट्रॅक्टर वर उरकलं होतं. मागच्या सहा महिन्यात दशरथ नानानं जवळपासचे सगळे जनावराचे बाजार पालथे घातले पण, मानाजोगी बैलजोडी मिळाली नाही म्हणून सगळीकडून परत आला.  बैलजोडी तरी कशी पसंत पडणार, ज्या त्या बाजारात तो गुण्या-सोन्यालाच बघायचा. गुण्या-सोन्या त्याच्या नजरं आड होत नव्हते.  बाजारात नवीन जोडी बघीतली की नाना तिची गुण्या-सोन्या सोबत तुलना करायचा. शेवटी निराश होऊन रिकाम्या हातानी आन भरल्या डोळ्यांनी घरला परतायचा. मागच्या सहा महिन्यांपासून हे आसच चाललं होतं. कुणीतरी कुठल्यातरी बाजाराचा ठेपा आणायचा. नाना पैश्याची थैली उचलायचा. बाजाराला जायचा अन पुन्हा संध्याकाळी रिकाम्या हातानं घरी परत यायचा. बैलजोडी तरी कशी पसंत येणार ! सोन्या-गुण्याच्या आठवणी अजून नानाच्या काळजात ओल्या होत्या. नानाला त्या विसरणं शक्य नव्हतं. बैलजोडी जराशी पसंत पडली की, मनात तुलना व्ह्यायची ...अन काहीतरी कारण सांगून नाना सौदा सोडून द्यायचा.

पेरणीचे दिवस जवळ आले होते. बैलजोडी वाचून सगळी मशागतीची कामं खोळंबली होती. शेत नीट करणं, नांगरट घालणं सगळं तसच होतं. नानाची मानसिकता रामाला कळत होती पण आजूबाजूला सगळ्या लोकांची मशागतीची कामं जोरात सुरू होती अन आपलं शेत मात्र अजून तसंच पडून होतं. आजवर नाना स्वतः पुढाकार घेऊन काम करून घ्यायचा, लहाना मुलगा रामा दिवसभर राबायचा. मोठा शिवा बीडच्या कॉलेजात वकिलीचं शिक्षण घेतो. महिन्या पंधरा दिवसाला गावाकडं आला की तो सुद्धा दिवसभर राबतो. सगळे मिळून काम करतात म्हणून शेत सोनं पिकवतं. नानाला दहाबारा एकर जमीन ! पण जमीन नंबर एकची, मेहनतीला फळ देणारी. उन्हाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर पाण्याखाली असणारं शेत. उन्हाळ्यात तेवढ दोन तीन महिने हिर तळ गाठते. माणसांना आणि जनावरांना पिण्यापूरतच पाणी हिरीला रहायच. हाहा म्हणता उन्हाळा सरायचा. शेतीची मशागत संपायची आणि पावसाचं आगमन व्हायचं. सगळ्या शिवारात पेरण्यांची लगबग सुरू व्हायची अन आठवड्यात पेरण्या उरकून झाल्या की पुढच्या आठ दिवसात काळं रान नवं रूप घेवून हिरवं व्ह्यायचं.

औंदा सुद्धा सगळीकडं अशीच लगबग सुरू होती, पण मागच्या वर्षी गुण्या-सोन्याला गमावल्यापासून दशरथ नानानं हाय खाल्ली होती. गुण्यासोन्या बिगर शेतात त्याचं मनच लागत नव्हतं. रामान मागच्या महिन्यापर्यंत बापाच्या बैलजीडीची वाट बघीतली आणि नंतर बापाला काही न बोलताच सरळ जिल्हा बँकेतून कर्जाची जुळवाजुळव करून एक दिवस ट्रॅक्टरच दारात उभं केलं. नानींन ट्रॅक्टर ची पूजा केली. शिवानं नारळ फोडलं. सगळ्या भावकीत प्रसाद वाटला. दशरथ नानाच्या पोरानं गावात ट्रॅक्टर आणल्याची बातमी सगळ्या गावात पसरली ! नानाच्या अन पोरांच्या मेहनतीचं गावातल्या जुन्या खोडानी कौतुक केलं. दुसऱ्या दिवसापासून ट्रॅक्टरनं गुण्या-सोन्याची जागा घेतली. गुण्या सोन्याच्या दावणीच्या जागेत आता ट्रॅक्टर दिमाखात उभं राहू लागलं. आधुनिकतेनं परंपरेवर मात केली की परंपरा इतिहासजमा व्हायला लागतात. इथं तर परंपरेनच जागा मोकळी करून दिली होती मग आणखी काय वेगळं होणार होतं ?

आता ट्रॅक्टर आल्यावर पोरांना नव्यानं उत्साह आला होता. मोठा शिवा सुद्धा भावाला मशागतीसाठी अन पेरणीसाठी मदत म्हणून कॉलेजला दांडी मारून आला होता. दुसऱ्या दिवशी दोघं भाऊ ट्रॅक्टर घेऊन तालुक्याला गेले. ट्रॅक्टरसाठी लागणारं डिजल, आईल काय काय ते सारं महिनाभर पुरंल एवढं एकदाच घेवून आले. पुढं एकदा कामाला लागलं की पेरणी करूनच दम घ्यायचा असं ठरवलं होतं. मोठं टीपाड भरून डिजल आणलं, कॅन भरून आईल आणलं. सगळं गोठ्यात ठिवलं. शेणामातीच्या गोठ्याला आता डिजलचा वास येऊ लागला. परंपरेच्या खुणा अजूनच धूसर होवू लागल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नव्यानं डिजल पेलेलं ट्रॅक्टर  धड धड करीत शेतावर हजर झालं. आजूबाजूचे पोरं सोरं काम धंदे सोडून बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर कसं काम करतंय ते बगायला आले. रामान पुन्हा एक नारळ फोडलं, आर्ध बंधावरच्या देवाला ठेवलं, एक तुकडा झाडाखाली बसलेल्या नानाला दिला, नानाच्या पाया पडला. बाकीचं नारळ जमलेल्या पोरांना दिलं. दोघा भावानं मिळून ट्रॅक्टरला नांगर जोडला. ट्रॅक्टर चालू झालं. एक एक तास घेत ट्रॅक्टर रान नांगरू लागलं. आतापर्यंत दिसलं नाही असं काळंखप्प रान दिसू लागलं. दशरथ नाना लांब सावलीला बसून सारं बघत होता. आता बैलांचा प्रश्न मिटला होता, काम सुरू झालं होतं. आता या शेतात कधीच गुण्या-सोन्या दिसणार नाहीत ह्या ईचारांनं नाना आतून गलबलून गेला होता. पोरांचा दोष नव्हता, पण हे सगळं इतक्या लवकर घडल अस नानाला वाटलं नव्हतं. काळाशी जुळवून घ्यायला नानाचं मन आजही तयार नव्हतं.

नारळाचा तुकडा तोंडात टाकून गुडघ्यावर हात देऊन नाना उठला बांधाबांधान शेताच्या दुसऱ्या बाजूला आला, अन जास्त चालवलं न गेल्यानं कोपऱ्यातल्या लिंबाच्या झाडाखालच्या बारक्या जुळ्या समाधीला पाठ लावून बसून राहिला. इकडं त्याच शेताच्या तुकड्यावर रामा शिवाच ट्रॅक्टर रान तय्यार करण्याच काम सुरू होतं, ते समोर पाहात असतांनाच नानाच मन भूतकाळात जातं.....

त्यादिवशी असच तय्यार झालेल्या रानात, मोठ्या उत्साहात पेरणी सुरू होती. आठ दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला होता. सगळीकडं पेरणीची कामं सुरू होती. नानाची पेरणी सुद्धा आता उरकत आली होती. तो पेरणीचा शेवटचा दिवस होता. गुण्या सोन्या हिमतीनं तिफण ओढत होते, नाना चाड्यावर हात धरून चालत होता. रामा शिवा मदत करीत होते, मागच्या चार दिवसांपासून पेरणी सुरू होती, त्या आधी पंधरा वीस दिवस शेत तय्यार करण्यासाठी गुण्या सोन्या जुंपले गेले होते. आज सकाळपासून गुण्याचं अंग गरम लागतं होतं, त्याला नीट चालता येत नव्हतं. नानाच्या लक्षात आलं होतं पण शेवटचा दिवस होता पेरणीचा, म्हणून नाईलाज होता. एकदा पेरणी संपली की तालुक्याचा डॉक्टर आणून औषधपाणी करू असा विचार करून, गुण्या सोन्याच्या अंगानं काम सुरू होतं. सोन्यासुद्धा जमेल तेवढ गुण्याच्या बाजूनं घेत होता. ऊन डोक्यावर आलं होतं, दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, पेरणीचा शेवटचा फेरा बाकी होता म्हणून शिवा घागर घेऊन हिरीवर गेला होता. इकडं नानांन शेवटचं तास घेतलं, पेरणी संपली, अन गुण्यानं अंग टाकलं. नानाच्या पायाखालचं रान सरकलं. नाना रामा गुण्याजवळ आला, जू बाजूला केलं. गुण्याच्या तोंडातून फेस निघतं होता, पायांची हालचाल मंदावत चालली होती. 'गुण्या काय आलं रं, उठ की ! बघ संपली आपली पेरणी, बघ शेत कसं दिसतंय, उध्या धान उगवून येईल बघ ! बघणार नाही व्हय तू !' आस म्हणून नाना गुण्याच्या गळ्यात पडला. सोन्या सुद्धा सौरभर झाला होता. हिरीवर गेलेला शिवा सगळी गडबड बघून हातात भरलेली घागर घेऊन धावत पळत आला . 'पाणी पाजा रं माझ्या गुण्याच्या कुणी तरी पाणी पाजा ! लय काम घेतलं रं माझ्या लेकरा कडून म्या' असं म्हणून नाना राडू लागला. गुण्याची हालचाल बंद झाली, रडारड ऐकून बाजूचे लोक जमा झाले. त्यातल्याच जाणकारांन तपासून गुण्याची प्राणज्योत मदावल्याच सांगितलं, अन नानाच्या दुःखाला पारावर राहिला नाही. त्यादिवशी नाना खूप रडला, अख्या जिंदगीत कधी रडला नसलं एवढा !

गुण्या गेला, नानानं त्याचे सगळे विधी केले अगदी घरातल्या नात्याचं कुणी गेल्यागत, पण दुर्दैव इथंच थांबलं नाही, गुण्याच्या जाण्याचा धोसरा जसा नानान घेतला तसाच कदाचित त्याहून जास्त सोन्यान घेतला, त्यानं अन्न पाणी सोडलं ! नानांन त्याच्यासाठी लय प्रयत्न केले, तालुक्याहुन डॉक्टर आणला, इंजेक्शन, औषध नाही नाही ते केलं. जाणत्या जुंनत्याला दाखवलं पण काहीच फरक पडत नव्हता. हे अंगचं दुखणं नव्हतंच !

गुण्या सोन्या सख्ये भाऊ, एका गायीचे गोरे ! सोबत राहिलेले, सोबत वाढलेले ! कामाला वाघ होते, आख्या पंचक्रोशीत त्यांचा डंका होता. लहान असल्यापासून नानाच्या देखरेखीत त्यांचं सगळं व्हायच. वैरण पाण्यापासून कामापर्यंत नाना सगळं स्वतः करायचा. पोरं बैलाला मारतेत म्हणून स्वतः औत हकायचा, स्वतः शेत करायचा. रामा शिवा पेक्षा जास्त प्रेम होतं त्याचं गुण्या सोन्यावर !

नानानं सगळे प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही, ते येणार सुद्धा नव्हतं करण नानाला सोन्याचं दुखणं माहीत होतं. माणसं आपलं दुःख बोलून हलकं करतात पण मुक्या प्राण्यांना ती ही सोय नसते, त्यांचं दुःखं फक्त डोळ्यातून झरत राहतं आणि ते देखील नाना सारख्या लाखातल्या एखाद्यालाच समजतं ! सोन्या सुध्दा गेला ! त्या दिवशी नाना दिवसभर त्याच्या सोबत बसून होता ! त्याच्या डोळ्यात  पाहून त्याच्याशी संवाद साधत होता. दिवसभर गोठ्यात झोपून असलेल्या सोन्यान नानाच्या मांडीवर तोंड ठेवून प्राण सोडले. नानांनं टाहो फोडला ! आसमंत गहिवरून गेला, पुन्हा गावकरी जमले, पुन्हा विधी झाले ! नानाचा गोठा रिकामा झाला ! तसा नाना सुद्धा रिकामा आला, त्याला दिवस खायला उठत होता ! दिवस दिवस नाना शेतात एकाच जाग्यावर बसून राहायचा. आभाळात डोळे लावून दूरवर एकटक पाहत राहायचा !

गुण्या सोन्याला जाऊन वर्ष होतं आलं होतं पण त्यांचं आठवणीनं नाना पार कोलमडून गेला होता, कुठलंच औषध काम करीत नव्हतं .... नाना कुणाशी बोलत नव्हता .... आपल्याच तंद्रीत तासंतास बसून राहायचा !

आज सुद्धा तेच चाललं होतं, शेतात ट्रॅक्टर सुरू होत अन नाना कोपऱ्यात लिंबाच्या मोठ्या झाडाखाली असलेल्या जुळ्या दगडी समाधीला पाठ देऊन
डोळे आभाळात लावून बसला होता. रामा ट्रॅक्टर चालवत होता, शिवा नांगरटीत ट्रॅक्टरच्या माग माग फिरत होता. दोघं भाऊ नव्या उत्साहानं कामाला लागले होते. समाधीच्या रानाची नांगरणी उरकली होती, इकडं ऊन डोक्यावर आलं होतं म्हणून दोघं ट्रॅक्टर बांधाच्या बाजूला सावलीत लावून नानां बसलेल्या लिंबाच्या झाडाजवळ आले. शिवानं झाडाच्या फांदीला बांधलेलं भाकरीचं धुटं सोडलं आन, 'चला नाना जेवून घ्या, नांगरट संपत आली बघा !' म्हणत नाना जवळ गेला. नानाचे डोळे अजून सुद्धा ढगातच होते. 'नाना आहो काय म्हणतोय मी, जेवायचं नाही व्हय !' शिवान पुन्हा विचारलं. नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता. शिवान रामाकडं पाहिलं तसं रामा जवळ आला,'नाना काय झालं !' असं म्हणून त्यान नानाच्या खांद्याला हलवलं .... अन नाना त्याच्या अंगावर कोसळला ! दोघं भाऊ घाबरून गेले ... नाना नाना करून हलवू लागले ... पण नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता ....तो शांत झाला होता ...! त्याच्या गुण्या - सोन्यासारखा त्यांच्याच समाधीजवळ त्यांच्यातच विलीन होऊन गेला होता.

गुण्या-सोन्या अन शेत म्हणजे नानाच विश्व होतं, जगणं होतं, गुण्या सोन्याच्या जाण्यानं त्याचा श्वास कोंडला होता तो मोकळा आला. समृद्धी वेगळी आणि समाधान वेगळं, गुण्या सोन्या सोबतचं जगणं अभावग्रस्त असलं तरी नानाला समाधान देणारं होतं, गोठ्याला येणाऱ्या शेणामातीच्या पारंपरिक सुगंधात त्याची ऊर्जा द्विगुणित व्हायची. शेत अन गुण्या सोन्याचं वैरणपाणी करतांना नानाचा दिवस भरगच्च असायचा, गुण्या सोन्याच्या जाण्यानं नानाचा दिवस मोठा झाला अन नानाला एक एक दवस ढकलन कठीण झालं होतं रिकाम्या गोठ्यात अधुनिकतेनं ठाण मांडलं होतं अन परंपरेची ओल सुकून गेली होती !

आज चार वर्षे झाली नानाच्या जाण्याला, पोरांनी बापाच्या आठवणीत नानाची समाधी सुद्धा त्याच कोपऱ्यात लिंबाच्या झाडाखाली गुण्या सोन्याच्या जुळ्या समाधी शेजारी बांधली आहे ! दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात जवळवून जाणाऱ्या अनोळखी वाटसरूला डेरेदार लिंब खाणावू लागतो अन वाटसरूचे पाय विनासंकोच विनासायास झाडाकडं वळतात, पाय विसावा घेतात, भाकरीचं धुटं सोडलं जातं, थंडगार पाण्यानं उन्हाचा आत्मा शांत होते रखरखत्या उन्हात चैतन्य सळसळायला लागतं. समाधीला पाठ लागली की अनोळखी रणरणत्या मनात परंपरेच्या आठवणींची ओल झिरपायला लागले !

- रमेश ठोंबरे

3 comments: