May 4, 2020

ओल आटलेल्या शहरात ...लॉकडाऊन असलेल्या शहरात...
ओस पडलेत रस्ते
अन ओसाड झालीत मनं

आटून गेलाय मायेचा निर्मळ स्पर्श
निर्जंतुकीकरणाच्या रेट्यानं
रखरखीत झालेत ओले हात

पेटत चाललीय पोटातली धग
विझत चाललीय डोळ्यातली आस
सुटत चाललेत हातातले हात !

वाढत चाललंय
माणसामाणसातलं अंतर
'दूर राहा, सुरक्षित राहा !'
असलं काहीतरी
वैश्विक म्हणून भरवलं जातंय
रिकाम्या माणसांच्या
रिकाम्या डोक्यात ....

'घरी राहा, सुरक्षित राहा !'
म्हणून पिटले जातायत
जबाबदारीचे ढोल
.. पण घरी राहून
सुटतात का कधी जगण्यातले प्रश्न ?
हे समजत कसं नाही,
या लोकांनां !

विचार करण्याचे
सर्व मार्ग बंद झाल्यावर
आता बसून आहेत लोक
घरातले घरात
अन रस्त्यातले रस्त्यात !

ओल आटलेल्या
या शहरात ....
आता पसरत चाललंय
फक्त वांझोट कारुण्य !- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_असलेल्या_शहरातून_2

No comments:

Post a Comment