Apr 3, 2012

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ
तिथं बांधतो मी घर
मला रुजाया पाहिजे
भग्न दगडांचा पार

तुझा फटका पदर
किती झाकशील उर
आसं लपणार नाही
तुझ्या दु:खाचं काहूर

रात अंधारली गूढ
दूर एकटी निजली
दिस आठवात गेला
कूस अश्रूंनी भिजली

नको रिती होऊ देऊ
दु:ख भरली ओंजळ
रित्या रित्या या घरात
सुख दिसलं ओंगळ

गर्द झाकोळली रात 
ओल्या दु:खाचा गाभारा
सुख अनावर झालं
केला देवानं पोबारा !  
                         
- रमेश ठोंबरे

Mar 23, 2012

कोणी म्हणे ...... ३ ..................६)



कोणी म्हणे येथं
काव्य फार झाले
त्याला मी दावले
अभिप्राय ||

कोणी म्हणे येथं
चौर्य हि उदंड
दावला मी दंड
डिलीटाचा ||

कोणी खोट काढी
शील अश्लीलाची
त्याला दिल्या शाली
जोड्यां सवे ||

कोणी म्हणे 'फेक*'
आहे येथं फार
'ई-बुक' 'त्यांचेची*'
गाजविले ||

कोणी म्हणे आहे
पसाराच फार
त्याला वर्तमान
दाखविले ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Mar 21, 2012

कोणी म्हणे ...... २ ..................५)



कोणी म्हणे मी रे
सहजची आलो |
येथलाची झालो
खर्या अर्थी ||

कोणी म्हणे माझी
भूक फार आहे
पूर रोज पाहे
कवितांचा ||

कोणी म्हणे गड्या
सापडला मार्ग
दूर आता स्वर्ग
दोन बोटे ||

कोणी म्हणे मज
आवडे हा मेळा
होती सर्व गोळा
एक धागी ||

कोणी म्हणे काय
आहे येथं खास
सोडवेना कास
माझे माय ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)