Jan 11, 2011

कविता ..........

शब्द शब्द चेतन्यासाठी ...
ठिणगीसम पडावी कविता.
लेक सासरी जाताना थोडी ...
हुंद्क्यातून अडावी कविता.

तिच्या गुलाबी ओठांवर,
एक नशीली सुचावी कविता.
सोबत तिची सुटली तरीही ...
सोबत 'तीच' असावी कविता.

उध्वस्त मनाच्या गाभार्यातून,
अभंगासम गावी कविता.
शुश्क मनाचे बीज रुजाया ...
मल्हारासम यावी कविता.

नव्या नवेल्या जन्मावर ..
पहिली वहिली लिहावी कविता
सरनावरच्या मरनावरही ...
शेवटचीच, एक हवी कविता.

थिजल्या हरल्या क्षणी पुन्हा,
राखेतून उडावी कविता.
साथ सुटता शब्दांची मग,
धुसमुसून रडावी कविता.

- रमेश ठोंबरे
( कवितेच्या प्रेमात ....!)

Jan 5, 2011

~ तुला पाहिल्याचा मला भास होतो ~

तुला पाहिल्याचा मला भास होतो

कळेना कधी मी तुझा 'दास' होतो.

तुझे चालणे हे किती जीव घेणे
मनी मोरनीचा खुला वास होतो.

अदा ती निराळी तुझ्या बोलण्याची
तुझा मूक बाणा भला खास होतो.

मिळालीच नाही मला ढील थोडी
जरी मी कधीचा तुझा 'ध्यास' होतो.

कळालाच नाही मला खेळ सारा
कसा या बटांचा कधी फास होतो.

नको आस दाऊ आता शेवटाला
चिता पेटताना उगी त्रास होतो !

नको वाट पाहू तिची तू रमेशा,
तुझा जीव घेणे तिचा श्वास होतो.


- रमेश ठोंबरे
(भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा)

Nov 21, 2010

~ आभाळ सारे फाटले ~


आभाळ सारे फाटले, सांगेन मी केंव्हातरी
ओठात आहे दाटले, सांगेन मी केंव्हातरी.

अंधारल्या रातीत मी, शोधीत आहे काजवे
सूर्यास कैसे वाटले ? सांगेन मी केंव्हातरी.

खाऊन ते शेफारले, लोणीच त्या प्रेतातले,
नरकात का ते बाटले ? सांगेन मी केंव्हातरी.

डोळ्यात आहे पाहिले, ते प्रेम मी सांभाळले,
काळीज केंव्हा फाटले, सांगेन मी केंव्हातरी.

नाराज झाल्या भावना, नाराज झाल्या वासना
नाराज विश्वा थाटले, सांगेन मी केंव्हातरी.

वाटा पुन्हा अंधारल्या, आधार सारे संपले,
आयुष्य कोठे काटले, सांगेन मी केंव्हातरी.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre