Jul 15, 2012

विठ्ठल विठ्ठल म्हणा ....


कर्मावरती भक्ती असू द्या, तयास विठ्ठल म्हणा
विठ्ठल विठ्ठल म्हणा चला रे विठ्ठल विठ्ठल म्हणा !

जगी रंजले, किती गांजले
अन्न, वस्त्र अन स्वप्न भंगले
दिन दुबळा दिसता कोणी, तयास विठ्ठल म्हणा ||१||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

शब्दावाचून उणेच सारे
शब्द बोलता, हसती तारे
शब्दावरती प्रेम असू द्या, तयास विठ्ठल म्हणा  ||२||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

निसर्ग आहे आपुला पिता
अन धरती हि अपुली माता
नतमस्तक व्हा नित्य तिथे, तयास विठ्ठल म्हणा  ||३||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

जिथे तिथे रे विठ्ठल वसतो
दगडा मध्ये विठ्ठल दिसतो
चरा-चराला विठ्ठल जाणा, तयास विठ्ठल म्हणा  ||४||

- रमेश ठोंबरे
  

 

   






Jul 6, 2012

रूप तुझे देवा

रूप तुझे देवा 
साठवावे डोळा 
तो नेत्र सोहळा 
सर्वश्रेष्ठ 
विठ्ठल विठ्ठल 
देह सारा बोले 
अनु रेणू झाले 
विठूमय 

विठ्ठलाचे सख्य
मागतो मी नित्य 
जीवनाचे सत्य 
हेची एक

तन हे विठ्ठल
मन हे विठ्ठल 
कर्म हि विठ्ठल
व्हावे आता.

 - रमेश ठोंबरे

May 25, 2012

विवाहितेची आत्महत्या


काल एक बातमी कानावर आली ...
विवाहितेने आत्महत्या केली... !
मनात विचारचक्र सुरु झाले
का ? कसे ? असे का केले.

तर्क वितर्कांचे ... थैमान सुरु झाले

नवर्याचा जाच असावा,
सासर्याचा त्रास असावा.
सासू खूप बोलत असेल,
नणंद मनात सलत असेल.

जगण्याला कंटाळली ...
कि आणखी कुणाला भाळली असेल
कोणी तरी नडले असेल
म्हणून अघटीत घडले असेल.

जगणं सध्या महाग आहे,
महागाईन घेरलं असेल.
डोक्यावर मोठा डोंगर असेल,
म्हणून सावकारीन मारलं असेल.

दुनियेलाही तो भीत नसावा,
नवरा दारू पीत असावा.
हे हि दु:ख दाटलं असेल
म्हणून 'औषध' घेतलं असेल. 

शेवटी काय ... !
जगणं तिला झेपलं नसेल
काळीज तिचं इतकं छोटं
कि दु:ख त्यात लपलं नसेल.

तर्क वितर्क हजार झाले ..
मनालाही पटून गेले.
यात तिचं चुकल काय ?
कित्तेक जीव असेल गेले.

सगळीकडचा आक्रोश
तिची कहाणी सांगत होता
माझ्या मनातला हरेक तर्क
मनात पुन्हा रांगत होता.

तेवड्यात एक टाहो आला
भुकेल्या पोटाचा .....,
दुधाच्या ओठाचा ....!

आता सगळे तर्क मातीत गेले
रांगते विचार जागीच मेले,
ती विवाहिता,
विवाहीताच राहिली असेल...
तिला शेवटपर्यंत
आईपण कळलं नसेल ! 

- रमेश ठोंबरे