Apr 15, 2012

~ तुझी आठवण येते ~

तू नसताना रांगत रांगत तुझी आठवण येते
चोर पाउली लाजत लाजत तुझी आठवण येते 

जिकडे तिकडे भयाण शांती गहिवरलेली गाणी
दंगा मस्ती वाजत गाजत तुझी आठवण येते 

बोट सुटावे हाता मधुनी अडखळती पाऊले
दुडक्या चाली चालत चालत तुझी आठवण येते 

अबोल झाली शब्द विखुरल्या पुस्तकातली पाने
बोल बोबडे बोलत बोलत तुझी आठवण येते

कधी बोचतो डोळ्यांमधला विखार जो सांडला
नेत्र बोलके गाळत गाळत तुझी आठवण येते

कधी आठवे फुगलेल्या त्या गालावरचा पापा
नाक नवेले मुरडत मुरडत तुझी आठवण येते

कुणास सांगू किती रमेशा आठवांत मी रमतो
आठवणींना टाळत टाळत तुझी आठवण येते

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment