Oct 3, 2012

अभिप्राय

तिने लेखन क्रिया केली
आणि त्याने,
लगेच प्रतिक्रिया दिली.

म्हणाला,
"वरून दुसरी ओळ ...
जराशी विसंगत झाली आहे.
आणि याच कारणाने हि द्विपदी
पार रसातळाला गेली आहे.

दुसऱ्या कडव्यातल्या तिसर्या ओळीत
एक शब्द जास्त आहे.
तू हवं तर मोजून पहा ..
माझं(च) म्हणन रास्त आहे.

तिसऱ्या चरणाच्या 'लगावली'त
थोडीशी गडबड आहे.
भाव-भावना ठीक ठाक
पण मात्रांची पडझड आहे.

चौथ्या कडव्यातील दुसरी ओळ
'अशी' लिहिलीस तर बरं वाटेल.
अर्थ थोडा बदलतोय
पण गाताना खरं वाटेल !

पाचव्या कडव्यामध्ये
काव्य कुठं दिसलं नाही,
आणि त्याच तिथे नेमकं
यमक सुद्धा बसलं नाही.

बाकी कविता चांगली आहे,
पण अजून छान होवू शकते.
थोडी उडी घेतलीस तर
आणखी उंच जावू शकते.  

आणि हो, एक राहिलं
सुरवातीला 'प्रिय' आणि शेवटी 'तुझीच'
असे शब्द कवितेत नसतात.
मी खात्रीनं सांगतो ...
हे फक्त प्रेमपत्रात लिहित असतात.


ता.क. : भावना ओतण्याच्या नादात लय सोडू नकोस !

- रमेश ठोंबरे
  http://rameshthombre.blogspot.com/

Oct 2, 2012

पातक

डोई टेकलं आभाळ
टेकू लावणार काय ?
अशी फाटली धरणी
धागा धरणार नाय !

भूक वाढल्या कान्हाचा
टाहो आसमंती गेला.
दुध सुकल्या स्तनाचा
पीळ काळजाला आला.

पीठ घातल्या पाण्याचा
घोट ओठामंदी दिला.
चुली म्होरल्या पिठाचा
घास भूकेल्यान नेला.

गुंडा पुरुष आधार
झाला चालण्याचा भार.
इथं पोटात काहूर
त्याले वासनेचा ज्वर.

असं भयाण जगणं
कसं देवाजीनं केलं.
कुण्या जन्माचं पातक
मह्या माउलीला दिलं ?    
  

- रमेश ठोंबरे
(जिथं फाटलं आभाळ)

Oct 1, 2012

गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग



१ अक्टोबर ची प्रत्येक रात्र ...
मला शांत झोपू देत नाही ...!
कितीही डोळेझाक केली तरी
वर्षभराचा लेखाजोखा डोळ्यासमोरून जात नाही.
मला आठवतात ...,
माझ्याच दैनंदिनीतील कितीतरी संदिग्ध नोंदी.
माझ्याच दैनंदिनीत झालेली सत्याची घुसमट !
असत्यावर डकवलेले ...सत्याचं पारदर्शक लेबल.

थोडस पुढं गेलं कि जाणवतो ....
वैचारिक आक्रस्ताळेपणा,
डोळ्यातून आग ओकणारी हिंसा...
आणि अवस्तावाचा ध्यास !
मला जाणवते...
मनातील अशांती, असंतोष.
आणि विचारांचा गोंधळ.

आणखी थोडं पुढं गेलं दिसतात ...
भुके-पोटी वणवण फिरणारे जीव
पाठीवरून तान्ह्याला घेवून कळवळणारी माय !
तिथेच कुठे तरी ... कधी नजर चुकवून ...
तर गर्दीचा फायदा घेवून ... माझे वळलेले पाय !

पुढे खूप काही ...
पण पुढच्या आठवणी दाबून ठेवतो ...
... कारण आता पहाट झालेली असते.
सूर्य किरणांची एक तिरीप
...हळूच खिडकीतून आलेली असते.

मी उठतो .....
सर्व विधी आवरून तय्यार होतो ...

खास आजच्या दिवसासाठी आणलेला
धोतर-पंचा महत्प्रयासाने अंगावर चढवतो.
बाहेर आलेल्या पोटाला थोडं आत ढकलतो.
... मध्ये मध्ये डोकावणाऱ्या पांढर्या केसांवर
गांधी टोपी ठेवतो.
शुभ्र पांढर्या फुलांचा एक हार हातात घेतो.
पुन्हा पोट सावरत ... कसरत करत
स्टुलावर चढतो आणि बापूंच्या फोटोला घालतो.
आता बापूंनाही कसं शांत वाटतं !
अन माझ्यातही गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग दाटतं !

- रमेश ठोंबरे
(२ ऑक्टोबर २०१२)
(महात्म्याच्या कविता)