Oct 2, 2012

पातक

डोई टेकलं आभाळ
टेकू लावणार काय ?
अशी फाटली धरणी
धागा धरणार नाय !

भूक वाढल्या कान्हाचा
टाहो आसमंती गेला.
दुध सुकल्या स्तनाचा
पीळ काळजाला आला.

पीठ घातल्या पाण्याचा
घोट ओठामंदी दिला.
चुली म्होरल्या पिठाचा
घास भूकेल्यान नेला.

गुंडा पुरुष आधार
झाला चालण्याचा भार.
इथं पोटात काहूर
त्याले वासनेचा ज्वर.

असं भयाण जगणं
कसं देवाजीनं केलं.
कुण्या जन्माचं पातक
मह्या माउलीला दिलं ?    
  

- रमेश ठोंबरे
(जिथं फाटलं आभाळ)

No comments:

Post a Comment