Oct 1, 2012

गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग



१ अक्टोबर ची प्रत्येक रात्र ...
मला शांत झोपू देत नाही ...!
कितीही डोळेझाक केली तरी
वर्षभराचा लेखाजोखा डोळ्यासमोरून जात नाही.
मला आठवतात ...,
माझ्याच दैनंदिनीतील कितीतरी संदिग्ध नोंदी.
माझ्याच दैनंदिनीत झालेली सत्याची घुसमट !
असत्यावर डकवलेले ...सत्याचं पारदर्शक लेबल.

थोडस पुढं गेलं कि जाणवतो ....
वैचारिक आक्रस्ताळेपणा,
डोळ्यातून आग ओकणारी हिंसा...
आणि अवस्तावाचा ध्यास !
मला जाणवते...
मनातील अशांती, असंतोष.
आणि विचारांचा गोंधळ.

आणखी थोडं पुढं गेलं दिसतात ...
भुके-पोटी वणवण फिरणारे जीव
पाठीवरून तान्ह्याला घेवून कळवळणारी माय !
तिथेच कुठे तरी ... कधी नजर चुकवून ...
तर गर्दीचा फायदा घेवून ... माझे वळलेले पाय !

पुढे खूप काही ...
पण पुढच्या आठवणी दाबून ठेवतो ...
... कारण आता पहाट झालेली असते.
सूर्य किरणांची एक तिरीप
...हळूच खिडकीतून आलेली असते.

मी उठतो .....
सर्व विधी आवरून तय्यार होतो ...

खास आजच्या दिवसासाठी आणलेला
धोतर-पंचा महत्प्रयासाने अंगावर चढवतो.
बाहेर आलेल्या पोटाला थोडं आत ढकलतो.
... मध्ये मध्ये डोकावणाऱ्या पांढर्या केसांवर
गांधी टोपी ठेवतो.
शुभ्र पांढर्या फुलांचा एक हार हातात घेतो.
पुन्हा पोट सावरत ... कसरत करत
स्टुलावर चढतो आणि बापूंच्या फोटोला घालतो.
आता बापूंनाही कसं शांत वाटतं !
अन माझ्यातही गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग दाटतं !

- रमेश ठोंबरे
(२ ऑक्टोबर २०१२)
(महात्म्याच्या कविता)

No comments:

Post a Comment