Oct 6, 2012

तुमच्या-माझ्या मनात

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत असतं
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत असतं.

थोडं कुठं दुखलं कि
आई आई म्हणत असतं
दु:ख तर असतच
पण दाखवण्यासाठी कण्हत असतं.

तुमच्या-माझ्या मनात एक
तान्हं मुल रांगत असतं

झोपाळ्यात बसलं कि
उगाच पोटात गोळा येतो
भीती लपवून चेहरा
खरच किती भोळा होतो ?

मला सांगा
मोठं झालं म्हणून काही
भ्यायचच नाही ?
डोळे मिटून दुध
आम्ही प्यायचच नाही ?     

चटक मटक दिसलं ... कि,
तुमच्या तोंडी पाणी सुटतं
'डॉक्टर गेला खड्ड्यात'
...मन बंड करून उठतं.

त्याला खाली बसवून
त्याची समजूत घालता
गरीब बिचारं मन...
खट्टू होवून बसतं
तुमचा चेहरा पाहून
तुमच्यावरती हसतं  
  
तुम्ही म्हणाल ..
मनात आलं म्हणून
सांगा कधी रांगता येत ?
मी म्हणेल ...
बालपण का सांगा 
खुंटीवरती टांगता येत ?

पण जावू द्या ना आता ..
लगेच कुठे रांगत आहात ?
तुम्ही अजून लहान आहात ..
हेच कशाला सांगत आहात ?     

कारण मला माहित आहे

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत आहे
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत आहे !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी) 

No comments:

Post a Comment