Dec 14, 2011

'सोशल' फटका
सोसलं तेवढं करत जा रे, सोशल सोशल करू नको
सोशल असते सत्यामध्ये, व्हर्चुअली तू झुरू नको  

नेटिंग, सेटिंग, च्याटिंग गडबड करू नको
उगी रहावे, काम करावे, निष्फळ बडबड करू नको 

फेसबुकावर मित्र हजारो, शेजार्याला विसरू नको, 
सोशल होतील बोल इथे, शब्दांमधुनी घसरू नको.

मिठी मारुनी, चित्र काढुनी, अल्बम सगळा टाकू नको
सोशल वरती उघडे केले, आता पिसारा झाकू नको !

झक मारितो झकरबर्गही, नियंत्रण ना असे इथे,
रस्त्यावरती येते सगळे, घरासारखा पसरू नको !

ह्यकर्स असती इथे तिथे, तू त्यांना थारा देऊ नको,
झापड बांधून डोळ्यावरती, नको तिथे तू जाऊ नको.

तुझ्याच हाती तुझी सुरक्षा, पासवर्ड तो लिहू नको,
आठवड्याला बदलत जा रे, जुना-पुराना ठेऊ नको.

ओळख नाही शीतभराची, फ्रेंड रिक्वेस्ट धाडू नको.
मित्राच्या मित्राचा मित्र म्हणुनी, उगाच नाते जोडू नको
   
फाईट करुनी लाईक करतो, उगा स्माईली फेकू नको,        
सत्य असावे ओठावरती, सत्य म्हणुनी ठोकू नको.   

पोरींच्या नावे पोरे भेटती, फोटूस त्यांच्या भाळू नको,
सल्ला देतो तुला 'रमेशा', 'फटका' म्हणुनी टाळू नको.

- रमेश ठोंबरे   

No comments:

Post a Comment