Aug 19, 2013

|| आज राखीचा ग सन ||आज राखीचा ग सन,
धाव घेई माझ मन ||
माझ्या ताईच्या मायेच,
सर्वात मोठं धनं ||१|| 

नको आडवू मज,
सखे आजच्या दिवशी || 
बंधूप्रेमावीन ताई,
राहे सालभर उपाशी ||२||

तिला भेटायला आज, 
झाला जीव हा व्याकूळ | 
राखीच्या निमित्तान 
आज काढलाय वेळ ||३||

हट्ट सोड तू ग प्रिये 
या आजच्या रातीचा ||
नाही राखीहून मोठा,
हा विरह प्रीतीचा ||४||

उगा नको रुसू,
आज आनंदाच्या क्षणी ||
भाऊ तुलाही आहे,
ठेव त्याला हि ध्यानी ||५||

परी प्रियेचा तो हट्ट,
नाही नाही कमी झाला |
अशा पेचामध्ये बंधू,
पार वैतागून गेला ||६||

काय कराव म्हणे, 
आसल्या या क्षणी ||
एकीचा मी आहे भाऊ,
आहे एकीचा मी धनी ||७|| 

पण नाही नाही आता,
आता थांबणार नाही ||
एक बहीणच आहे,
तिला टाकणार नाही ||८||

भाऊ निघाला हो आता,
सारे बंधन तोडून ||
एक दिवसासाठी,
सुखी संसार मोडून ||९||
...
आला धावत पळत,
घोट आसवांचा गिळत ||
बहिणही होती तशी,
भावालाच न्ह्याळत ||१०||

उभी दारात बहिण,
हाती रेशमाची राखी ||
ऐकता भावाची कहाणी,
झाली मनोमनी दु:खी ||११||

ओलावल्या नयनांनी,
तिनं बांधियली राखी || 
पाठीराखा भाऊ माझा, 
मी ही तुझी पाठीराखी ||१२||
...
आता बहिण निघाली,
बंधू भावाच्या दारी ||
विनवण्या वाहिनीला 
मोडलेल्या संसारी ||१३|| 

घरी भावाच्या जाता, 
बहिणीस वहिनी दिसली ||
म्हणे वहिनी तू का ग,
माझ्या दादावरी रुसली ||१४||

भाऊ माझा ग प्रेमळ,
कसा विसरेल तुला ||
एक बायको आहे,
एक बहिण ग त्याला ||१५||

एक पाठशी आलेली,
एक पाठशी जाणार ||
दोघी त्याच्या पाठराख्या 
कसा कुणाला सोडणार ? ||१६|| 

आज राखीचा ग सन 
धाव घेई त्याच मन ||
उद्या तुझच होयील,
पती नावच हे धनं ||१७|| 

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

No comments:

Post a Comment