Aug 7, 2013

एक वळवळणारा किडा



आज एकदाचा सोक्ष-मोक्षच लावायचाच 
असा पक्का इरादा करून …. 
सात माजली इमारतीच्या पायर्या चढून… 
गच्चीवर आलो … 
बापू आधीच पोचले होते,
माझीच वाट पाहत होते …!

माझ्या छातीचा भाता झालेला पाहून
माझ्याकडे एक कुत्सित नजर टाकून
बापूनी विचारले !
'बोल काय म्हणतोस ?'

मी धापा टाकत म्हणालो ….
"तुम्हाला काही बोलायच तर
हे अस … सातव्या मजल्यावर याव लागत…
नाहीतर त्या तिथे खाली बोलत बसलो तर …
लोक वेड्यात काढतात मला"

"कालच तो श्याम म्हणत होतो,
माझ्या बोलण्यात राम नाही म्हणे
माझं एकतर्फी बोलणं असत्य वाटतं त्याला !
तुमच्याशी माझं बोलणं असत्य ठरवतात हे लोक…

आणि तो पहा तिकडे तो नईम …
रस्त्यावरच हिंसेचा ठेला मांडून बसलाय.

द्वेष आणि इर्षा तर यांच्या जगण्याची
तत्वच बनलीत !

आणि अशांती तर प्रत्येकाच्या
डोक्यात थयथयाट करत असते.

मग मला सांगा बापू कुठे दिसतेय तुम्हाला …
सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती ?

बापू खाली बोट दाखवत म्हणाले …
"एवढ्या दूरवरून नाही दिसणार ती.
ती तर तिथेच आहे, जिथून तू पळ काढलास ….
जिथे तू 'असत्य, हिंसा, द्वेष आणि अशांती'
पाहिलीस तिथेच तुला
'सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती !' हि शोधावी लागेल !

मी खाली वाकून पाहू लागलो ….
शामची टपरी, नईमचा ठेला आणि विस्तीर्ण वस्ती !
थोड्या वेळाने मागे वळून पाहतो तर बापू निघून गेले होते
माझ्याच डोक्यात पुन्हा एक नवीन किडा सोडून….
आणि तो अजून हि वळवळतो आहे !

- रमेश ठोंबरे 

No comments:

Post a Comment