Nov 5, 2011

१) || ससा आणि कासव ||




एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |
गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||

म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |
असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||

कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |
याला ध्येय कसे दिसे | आळ्श्याला || ३ ||

जाया निघे बारश्याला | काळ उलटुनी गेला |
पोचे मग लगनाला | कसा तरी || ४ ||

करू म्हणे थोडी मौज | त्याने लावियली पैज
कासवास जिंकू आज | शर्यतीत || ५ ||

कोण जाई म्हणे वेगे | डोंगराच्या पाठी मागे
त्याचे मग नाव लागे | जिंकण्याला || ६ ||

कासवही धन्य धन्य | पैज त्याने केली मान्य |
करू म्हणे आज शून्य | गर्व याचा || ७ ||

रोज आहे उड्या घेत | वर तो वाकुल्या देत |
करू याचे नेत्र श्वेत | एकदाचे || ८ ||

पैज ठरे, दिस ठरे | संगतीला सखे खरे |
कोण जिंके कोण हारे | दिसे आता || ९ ||

पैज झाली आता सुरु | ससा लागे मार्ग धरू
कासव हि तुरु तुरु | चालू लागे || १० ||

दूर दूर गेला ससा | झाला आता दिसेनासा |
उमटेल कसा ठसा | कासवाचा ? || ११ ||

ससा गेला वेगे दूर | जसा भरला काहूर |
त्याला सापडला सूर | जिंकण्याचा. || १२ ||

ससा पाहे आता मागे | कुठे कासवाचे धागे |
त्याला वेळ किती लागे | गाठण्याला || १३ ||

कासव ते दूर म्हणे | कधी व्हावे इथे येणे |
तोवर ते शांत होणे | गैर नाही || १४ ||

ससा झाला कि निश्चिंत | त्याची मिटलीच भ्रांत
विसावला थोडा शांत | तरू तळी || १५ ||

वनी देखिले गाजर | क्षुधाग्णी तो पेटे फार |
कंद ते घेऊन चार | भक्षीतसे || १६ ||

कोवळे ते खाता कंद | हालचाल होई मंद |
नयनहि होती धुंद | व्याकुळले || १७ ||

प्राशी नीर ते शीतल | मग डळमळे चाल |
नयनी निद्रेचा ताल | घुमू लागे || १८ || 
 
निद्रे झाला अर्धमेला | सुख स्वप्नी तो रंगला |
वाटे जसा स्वर्गी गेला | आपसूक || १९ ||

पुढे कासव ते चाले | त्याची एकलीच चाल |
त्याचा एकलाच ताल | योजिलेला || २० ||

नाही थांबले ते कुठे | जरी कोणी मित्र भेटे |
न ही जिद्द त्याची सुटे | चालण्याची || २१ ||

चाले संथ गती तरी | त्याची साधना ती खरी
आणि खात्री मनी धरी | जिंकण्याची || २२ ||

चाले असे लगबगे | पाठी घेउनिया ओझे |
ध्येय गाठण्यास चोजे | शर्यतीचे || २३ ||

त्याने सोडीयेले मागे | बघा आळसाचे धागे |
पुन्हा पुढे चालू लागे | लक्ष्याकडे || २४ ||

पहिला तो ससा त्याने | झोपलेला तरू तळी |
झोप उतरली गळी | सारी सारी || २५ ||

कासवाने केली शर्त | म्हणे नडलाची धूर्त |
श्रम नाही गेले व्यर्थ | धावण्याचे || २६ ||

मग पुन्हा घेई वेग | मागे मागे धावे मेघ |
नाही आली प्राण्या जाग | झोपलेला || २७ ||

लक्षभेद कासवाचा | पोहचला शेवटला
तेंव्हा वेग मंदावला | विसाव्याला || २८ ||

दिस ढळे जाग येई | आता काही खैर नाही |
ससा मागे पुढे पाही | कासवाला || २९ ||

शोधीयेले काटे कुटे | कासव न दिसे कुठे |
आता मनी भीती वाटे | हरण्याची || ३० ||

लागे मग पुन्हा पळू | आणि पुन्हा मागे वळू
आता कशी हर टाळू | दिसणारी || ३१ ||

एक तो प्रहर झाला | डोंगराच्या मागे आला |
पाहून तो घाबरला | कासवाला || ३२ ||

कासव ते हसे गाली | कशी तुझी गती गेली
म्हणे फजितीच झाली | वेगा ची हो || ३३ ||

करू नको गर्व म्हणे | कष्टा विन सर्व सुने |
आळसाचे तुझे जिने | नडले रे || ३४ ||

ससा म्हणे चूक झाली | उगी तुझी थट्टा केली
जागा मला दाखविली | तूच लेका || ३५ ||

रमा म्हणे गर्व नको | करता हे काम मोठे
भोगीयले त्याचे तोटे | ससोबाने || ३६ ||

- रमेश ठोंबरे
अभंग गोष्टी (अधारित) 

No comments:

Post a Comment