Mar 21, 2012

कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ? (दीर्घ कविता)


.. १ ..
रांगड्या या शेतामंधी रांगडा हा बाप
चालताना त्याच्यासंग माय खाई धाप

शिकशील चार बुक होशील तू मोठा,
तेंव्हा साऱ्या कष्टाला मग देशील तू फाटा.

आस गोड भविष्याची धरुनी ती मनी,
राबतोय उन्हामंदी कष्टाचा हा धनी.

उनाळ्याच्या दिसामंदी पळस फुलला,
तुझ्या सुखापायी त्यानं अंगार झेलला.

दमलेल्या अंगाला या कष्टाचाचं साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..२..
माय तुझी बापासंग ओढतीय गाडा
वाचणार कशी तिच्या दु:खाचा र पाडा ?

गायीला त्या वासराचा येतोया आठवं
दाटतात तिच्या मग डोळ्यात आसवं

फाटलेली चोळी सांगे दारिद्र्याचं जीण,
अन काळ्याभोर धरतीचं हिरवं ते लेणं.

अनवाणी पायी माय चाले बिगी बिगी
सोडला दुष्काळ आहे डोळ्यामोर्ह सुगी

दिस येता डोईवर पदरी हि भिजं
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..३..
शिकण्यास पोराची केली बोळवण,
शहरात आलं एक उंडारलेलं बेन.

शेत नको माती नको हवं याला काय ?
शिकणार नाय माती मसणात जाय !

बाप राबे शेतामंदी याला नाही तमा,
शहरात वागण्याची गाठणार सीमा.

शहरामंदी पोराचा हा पाहुनिया थाट,
वाकलेला बाप मग चाले बघा ताट.

पोऱ्या बोले इंग्लिश चाले बापा मोर्ह 
बापा वाटे शहरात शिकतंय पोरं

बापाच्या र बोलण्याचा नाकातून बाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..४..
शहराची शानशोक विसरला गाव,
बापाचं हि येत नाही तोंडामध्ये नावं,

कॉलेजात जातो मग सजून धजून,
फाटलेल्या चड्डी मध्ये थोडासा बुजून.

कॉलेजात पाही अश्या पोरी गो-या गो-या,
एका वर्गामंदी चाले दोन दोन वा-या.

बुकामध्ये याचं मन रमणार कसं...?
याला आता लागलेला वेगळाच ध्यास.

दाणा नाही पोटामध्ये, शहराचा माज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..५..
बाप म्हणे शिकणार होणार हा मोठा,
कुणब्याच्या घरी नाही आनंदाला तोठा.

मायेन बी आस आहे जीवाला टांगली,
पाहतेया रातीला ती सपान चांगली.

मायेच्या या सपनाची काय तुला जाण,
बापाच्या हि कष्टाचे आहे कुठे ध्यान ?

दिसभर झोप घेइ, करी रातीचा दिवस
कोण्या मोसोबाला याचा घालावा नवस ?

मिळणार कसा तुला ज्ञानाचा र साज ....
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..६..
सोडीला तू गाव झाला शहराचा बाबू,
गावामंदी येता नको नाक तोंड दाबू.

याच शाळेमंधी होता गिरवला 'एक'
आज हि न कळे तुला जगण्याची मेख.

हाच तुझा गाव आहे, हेचं ते राउळ.
नवस फेड्या मारुतीचं हेचं ते देऊळ.

बसायला दिला तुला पटक्याचा सोंगा,
तुझ्या डोक्या मंदी असे वेगळाच भुंगा.

गोठ्या मंधी शिरताच झाली तुला खाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..७..
शिकला हा चार बुक विसरला गाव.
गोठ्यातल्या गायीचं हि विसरला नाव,

बहिण हि झाली आहे आता बघ मोठी
लाज तिची झाकातेय फाटकी चीरोटी

मन तिचं तुला कधी उमजलं नाही
डोळ्यातलं सपान बी समजलं नाही

बापाची हि चिंता आता वाढलीय फार
वयातली लेक त्याला वाटतीय भार

अंगावरी शोभे तिच्या योवानाचा साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..८..
लेकी साठी रान आता टाकलं गहाण
पायामंदी टोचतीया रोजचीच वहाण

पांढरया या सोन्यानं बी दिला औंदा दगा
आता तरी थेंब सोड वांजोट्या रे ढगा

जमीन कोरडी पिक गेलं र जळून
वाट तुझी पाहता दिस गेला र ढळून

तुझ्या पायी लेका दिस-रात एक केली.
शेवटला तुला त्याची सय नाही आली,

गळ्यामंदी फास डोई सावकारी व्याज
कुणब्याच्या पोरा ठेव याची आता लाज ?


- रमेश ठोंबरे

1 comment:

  1. Waa kaviraj,
    ekdam zakas kavita, gavakadchi lai athvan aali baga. Dhanywad aashic pragati kara.

    Regards
    Laxman Edake

    ReplyDelete