Mar 8, 2012

स्वत:चा रंग शोधूया

सगळीकडे रंगच रंग
रंग लाल, हिरवा नि निळा,
रंग पिवळा, पांढरा नि काळा
आकाशाला भिडणारे रंग..
जमिनीवर कुढणारे रंग,
उत्साहाने नाचणारे रंग
निराशेने खचणारे रंग.

.... रंग निराळे द्वेशाचे,
.... रंग निराळे आशेचे.
.... रंग निराळे संवादाचे..
.... रंग निराळे भाषेचे.

रंग काळा द्वेशाचा,
रंग पांढरा शांतीचा.
रंग हिरवा प्रसन्नतेचा
रंग लाल क्रांतीचा.

रंग, कुणी केशरी, केशर उधळत आले
रंग, कुणी गुलाबी, फुलांवर जावून बसले.
रंग, कुणी हसरे, हसत नाचत आले
रंग, कुणी लाजरे, रंगात हरउन बसले
रंग, कुणी बोलके, रंगरंगत बोलून गेले
रंग, कुणी अबोले न बोलता सांगून गेले.
रंग, कुणी फुलांचे, फुलांवरील फुलपाखरांचे
रंग कुणी मायेचे, मायेच्या लेकरांचे.

. ....
कुणी रंग - तरल डोळ्यांचे
कुणी डोळ्यांवरील फुटक्या काचांचे
कुणी रंग मस्त जीवनाचे
कुणी अडखळलेल्या शेवटच्या श्वांसांचे.
रंग सगळेच वेगळे ..
रंग सगळेच निराळे.

..... रंग भाकरीचा, भुकेसाठी अमूल्य आहे
..... रंग चाकरीचा मूल्यात तुल्य आहे.
..... रंग आसवांचा संथ ओघळणारा..
..... रंग गोड चवीचा, जिभेवर विरघळणारा.

रंग वेगळा खेड्याचा
खेड्यातील झाडांचा...
रंग वेगळा शहरांचा
शहरांतील जंगलाचा.
रंग गर्द हिरवा झाडाचा
आणि काळा पांढरा शहरातील जंगलांचा...
आग ओकना-या भट्याचा ...
आणि धूर फेकणा-या चिमण्यांचा.

..... वेगळा रंग डोंगराचा
..... डोंगरातील त्या दर्यांचा
..... वेगळा रंग रस्त्यांचा
..... रस्त्यांशेजारील मोर्यांचा.

जिकडे तिकडे रंगच रंग ...
पहाल तिकडे रंगच रंग ...
मग तुमचा रंग कोणता ?
रंगरंगात मिसळणारा भामटा ..
कि अलिप्तवादी पांढरपेशी ?
सर्वात मिसळून सामाजिक भावनेन वावरणारा
कि, स्वतंत्र अस्तित्वासाठी झटणारा ?
वाटाघाटी करणारा...
कि तत्वासाठी भांडणारा ?
घाबरून मागे सरणारा
कि प्रसंगी टक्कर देणारा ?

....
आज आहे तो उत्सव...
हजारो लाखो रंगांचा
रंगांच्या त्या ढंगाचा ...
चला आता रंग शोधूया
चला आता संग शोधूया
रंगाच्या या उत्सवात
स्वत:चा रंग शोधूया.

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment