Sep 30, 2011

|| लेकीच्या ओव्या ||


काय सांगू शेजीबाई, माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई, खस्ता काढल्या कितीक

होती लहान ती जवा, सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास त्याला भरवाया.

भाऊ शाळेमंदी जातो, गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन, त्याची आडाणी बहीन.

आली वयामंदी जवा, लाज अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर करून पाहीना.

हात पिवळे करण्या, बाप बोलला झोकात,
देण्या-घेण्याच्या रीवाजी, त्याचं मोडलं पेकाट.

चाले लगनाची घाई, गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना, तिला आईचाच घोर !

जाता सासराला लेक, झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं, लक्ष्मी भरतेया पाणी.

लेक माझी ग गुणाची, नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी, लेक मायीच्या मनाची.

लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते घास,
लेक कोरडा कोरडा, लेक पान्हाळली कास

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
(अक्षरछंद)

No comments:

Post a Comment