Jun 4, 2011

सुपारी दिलीय 'साल्याची' ....


वाट अडउन बसतो ...
तिच्या छत्रीत घुसतो.
माझ्या कडे मात्र ...
विचकट विचकट हसतो.

रोज रस्त्यात गाठतो ...
तिला योग-योग वाटतो,
माझा मात्र पाहताच ...
खरोखर जीव फाटतो.

लटकना सारखा लोम्बतो
अंगा-अंगाला झोंबतो
मी दूर दिसलो कि ...
तिच्या आडोश्याला थांबतो.

याच्या डोक्यात नेहमीच मला
चिडवण्याची खाज आहे .
रस्त्यात तिला चिकटतो ..
याला कसली लाज आहे !

तो तसा साव आहे ..
हा त्याचाच डाव आहे.
माझ्या पेक्षा हि वाढलेला
सध्या त्याचा भाव आहे.

तेंव्हा, तो मला टाळायचा
आता तीच मला टाळते ...,
कळत नाही कशी याच्या
ओलाव्याला भाळते.

आता सहन होत नाही ..
ती प्रीत गाणं गात नाही
मी साद घालतो तेंव्हा ..
कधीच 'ओ' देत नाही.

सगळा त्याचा खेळ आहे...
ढगाळलेला काळ आहे,
सुपारी दिलीय 'साल्याची' ....
आता माझी वेळ आहे,

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment