Sep 17, 2011

पाऊस मला भेटला .....

















||१||
दूरवर उंच उंच .. अलगद खाली येणारा,
आभाळाचा थेंब घेऊन धरतीला देणारा.
उजाड उजाड ... उदास उदास माळावर ....,
पाऊस मला भेटला
कणखर, बेडर डोंगराच्या भाळावर. 
||२||
बेधुंद आवेगाने झरझर कोसळणारा,
उतावीळ, अधीर अल्लड फेसाळणारा.
चिंब ओल्या काळ्याशार केसांच्या दाटीत ....,
पाऊस मला भेटला
धुंद, मदहोश प्रेयशीच्या मिठीत. 
||३||
रस्ता चुकलेला.. एकटाच मनमोज्जी
अडउन धरतो वाट ... एकांडा फौजी.
अज्ञात निर्जन अनोळखी वाटेवर .....,
पाऊस मला भेटला
स्वछंदी, आनंदी वार्याच्या लाटेवर.
||४||
काळ्या मातीस भेटण्यास आतुर,
बंद मुठीत प्रेमाचं काहूर.
सळसळनार्या हिरव्यागर्द शेतावर ....,
पाऊस मला भेटला
राकट, दनगट शेतकऱ्याच्या हातावर.
||५||
पावलो पावली अडखळनारा,
जीव मुठीत घेऊन ढासळणारा.
एकसंघ...एकसाची जुनाट किल्लीमध्ये ...
पाऊस मला भेटला
अरुंद, खोलगट अश्वासक गल्लीमध्ये.
||६||
नित्य-नेमाने डोंगररस्ता गाठणारा,
भक्ती भावाने ओत प्रोत भिजणारा.
भोळा भाबडा...दर्शनाच्या तयारीतला ...
पाऊस मला भेटला
भक्तीमय, शक्तीमय पंढरीच्या वारीतला.
||७||
स्वच्छ, नितळ, पांढरा शुभ्र भासणारा
नोकरदाराच्या फजितीवर हसणारा
रात्रभर जगलेला..दिवसाच्या झोपेतला
पाऊस मला भेटला
घड्याळावर चालणाऱ्या नियोजनबद्ध शहरातला
||८||
वेगाला भावणारा, धावत्याला शिवणारा,
ज्याचा वेग चुकला त्यालाच पावणारा.
साखरमान्याच्या टोपीत, चाकरमान्याच्या झब्यात
पाऊस मला भेटला
वक्तशीर, दाटीवाटीच्या लोकलच्या डब्यात.
||९||
स्वच्छंदी, उनाड वर वरच्या प्रेमाचा
मौज मजा अन सुट्टीच्या नेमाचा.
भेल, पाणी पुरी, आईस्क्रीमच्या पाटीवर
पाऊस मला भेटला
सजल्या गजबजल्या मुंबईच्या चौपाटीवर
||१०||
सात्विक, शुद्ध सांस्कृतीक चालीचा,
तर्कट, हेकट शहाणपणाच्या ढालीचा.
सरळ मार्गातील वाकड्या वाटेतला.....
पाऊस मला भेटला
रुंद अरुंद वक्तशीर पुणेरी पेठेतला. 
||११||
जीर्ण नाती मनापासून जोडणारा,
आयुष्याचे दिवस कसे तरी ओढणारा.
पोट भरल्यानंतर लाथाडलेल्या ताटावर ....
पाऊस मला भेटला,
निराधार, निराश्रित म्हातारीच्या बेटावर.
||१२||
अथांग, दूर दूरपर्यंत पसरलेला,
लाज, लज्जा सर्व सर्व विसरलेला.
बेभान, बेपर्वा आयुष्याच्या पिचवर....
पाऊस मला भेटला
उघड्या, नागड्या, थिल्लर विलासी बीचवर.
||१३||
बेरहम, बेदरकार एकट एकट गाठणारा
बेमालूम, बेसावध शेवटचं भेटणारा.
अवघं जगणं जिंकताना हरलेल्या मरणावर....
पाऊस मला भेटला,
मरनासन्न, असहाय, प्रेतावरच्या सरणावर.
||१४||
तरुण, तडफदार होयबानसोबत फिरणारा,
नाटकी, बेगडी पण सर्वांचा आवाज ठरणारा.
विरोधासाठी विरोध म्हणून चाललेल्या चर्चांवर
पाऊस मला भेटला
कष्टकरी, कामगारांच्या विकल्या गेलेल्या मोर्च्यांवर.
- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

No comments:

Post a Comment