May 26, 2011

तुला परत यायचं असेल तर


महात्म्या, तुला परत यायचं असेल तर,
तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.
कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाही
आज अहिंसेला आम्ही अडगळी शेजारी जागा दिलीय,
कारण अहिंसा म्हणजे आज फक्त गांधीवाद्यांची झालीय...

अहो गांधीवादी तरी कसले ते...?
नुसते गांधीवादी म्हणवुन घेणारे,
आणि अंधारात सत्तेसाठी...
सत्त्यासाठी नव्हे महात्म्या, सत्येसाठी!
अंधारात सत्तेसाठी पाठीत खंजर मारणारे,
आणि डळमळत्या खुर्चीला...
पडण्याआधी तारणारे.
हे आजचे अहिंसावादी...
हे आजचे गांधीवादी.
म्हणुन अहिंसा नको.

आणि हो, तो सत्याग्रह तरी कशाला आणतोस?
कुणाचे ग्रह हलणार आहेत त्यानं?
कुणाचे विचार बदलणार आहेत त्याने?
महात्म्या, ते प्रेम ही नकोस आनू
दोन दिवसात पार बो-या वाजेल त्याचा,
आजच्या स्पर्धेच्या युगात.
कारण, आज आम्ही धावण्याची शर्यत...
प्रेमाने नाही तर पायात पाय घालुनच जिंकतो...
आणि हो, आम्ही कुणाचं भलं करु...
अशी आशाही आमच्याकडुन करु नकोस,
कारण तिथच तर आम्ही शिंकतो
म्हणुन प्रेम ही नको.

आणि महात्म्या ती, करुणा आणि शांती,
ती तर नकोच नको.
गांधीवादाचे पुरस्कर्ते म्हणुन ठेवली होती...
हीच नावे आम्ही आमच्या मुलींची
पण तीही त्यांनी कधीच बदललीत,
आजच्या आधुनीक युगात 'सुटेबल'
होत नाहीत म्हणुन

तेंव्हा आता यायचं असेल तर,
सत्त्यासोबत असत्त्यालाही घेऊन ये.
आता चरखा नकोय ...एखादी गन घेऊन ये,
महात्म्या तु जरुर ये.... पण येताना,
आमच्या सारखंच पांढरपेशी मनही घेवुन ये!


रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment