Jun 13, 2011

~ असे घाव देसी जिव्हारी कशाला ? ~


असे घाव देसी, जिव्हारी कशाला ?
म्हणे 'प्रेम केले, उधारी कशाला' ?


तुझा घोष झाला, उभा श्वास माझा
उगा ढोल, ताशे, तुतारी कशाला ?


पुरे नेत्र राणी, असे जीव घ्याया
तिथे कुंतलांची, दुधारी कशाला ?


जिथे दूध सौख्ये, मिळे मांजराशी
तिथे कावळ्याची, हुशारी कशाला ?


दुवा दे, सजा दे, मला काय त्याचे
मुक्या सावजाला, शिकारी कशाला ?


तुझे प्रेम माझा, फुका जीव घेते,
पुन्हा सांग घेऊ, भरारी कशाला ?


नको रे मना तू, तिचा ध्यास घेऊ,
जिथे देव नाही, पुजारी कशाला ?


रमेशा असा तू, कसा व्यर्थ गेला,
म्हणे प्रेम केले, बिमारी कशाला ?


- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment