Aug 18, 2011

सविनय कायदेभंग


अमक्या अमक्या कारणासाठी
तमक्या तमक्या संघटनेकडून
आज शहर बंदचं आवाहन ....

वेळ सकाळी १० ची
अर्धवट उघडी दुकाने ...
सामसूम रस्ते ...
हातात लाठ्या काठ्या घेऊन
फिरणाऱ्या टोळभैरवांच्या टोळ्या.
अन वातावरण निर्मितीसाठी ...
रस्त्यावर जुनाट टायरांच्या होळ्या !

वेळ : दुपारी साधारण १ ची ...
सामसूम रस्त्यावर
'प्रवाश्यांच्या सेवेसाठी'
नजर चुकवत धावणारी बस,
अन नजर ठेऊन बसलेल्या टोळीने ...
बरोबर पकडलेली नस !
पुढच्या १० मिनिटात ....
पेटलेली बस ....
पुन्हा सगळे रस्ते ओस !

विजयाचा चित्कार ...
मर्दुमकीचा फुत्कार
अन सरकारचा उद्धार !

वेळ दुपारी २ ची ...
नजर चुकवून उघडलेल्या दुकानाची होळी,
पसार झालेली टोळी,
आणि निरपराध्यांवर गोळी !

जाणता-अजाणता,
वेठीस धरलेली जनता,
भावनांचा उद्रेक... अन पेटलेलं वातावरण.
का ..? कशासाठी ..? सगळं काही विनाकारण !

वेळ : सायंकाळी ६ ची
चार खांदेकऱ्यांसह ...

खादी कपड्यातील बगळे हात जोडून रस्त्यावर.
टगेगीरीच्या जोरावर ...
घडवून आणलेल्या कडकडीत बंदच
श्रेय लाटण्यासाठी !
म्हणे ... बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल
धन्यवाद !

बंदच होता हा ...,
पण आजचा नव्हे ....!

आजचा बंद म्हणजे काय बंद होता ?
कोणीतरी धमकावण्या आधीच सर्व रस्ते, दुकाने बंद आहेत.
शिस्तबद्ध फेऱ्यांमधून निषेध आणि वंदे मातरम च्या घोषणा आहेत.
ने-आण करणारी वाहने बिनदिक्कत धावत आहेत.
पोलिसांच्या लाठ्या मूक साक्षीदार बनल्या आहेत ...
अन बंदुकींच्या गोळ्या आतल्या आत शमल्या आहेत.
सगळा बंद फिका फिका,
अन आजचा बंद म्हणजे
'बंद' या संकल्पनेलाच धोका !
.
..
...
....
.....
बापू ...,
एक विचारू ?
या लोकांना सत्याग्रह तर पटला नाही ना ?
आजचा बंद म्हणजे यांना सविनय कायदेभंग तर वाटला नाही ना !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

1 comment: