Oct 15, 2011

भाई (Vidamban)

भाई
भाई एक
नाव असतं.
शहरातल्या शहरात
गुंडगिरीचं गाव असतं!

सर्वांत असतो तेव्हा
जाणवत नाही.
आणि नसला कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही

खत्रा रंगतो
टाहो उठतात.
बारक्या गल्लीत
उमाळे दाटतात.

भाई गल्लोगल्लीत तसाच
जातो घेऊन काही.
जिवाचं जिवालाच
कळावं असं
आस देऊन काही.

भाई असतो
एक धागा
जगात उजेड पडणारी
दुबईतली जागा.

जग उजळतं तेव्हा
त्याला नसतं भान
विझून गेली प्राणज्योत की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान.

भाई येतात जातात
गल्ली मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान.
दिसत नसलं डोळ्यांना तरी
सापडत गेलो
गल्ली बोळ की,
सापडतेच ती दादागिरीची खाण.

याहून का निराळा असतो भाई ?
तो गल्लीत नाही तर मग
कुणाशी बोलतात गोठ्यात
हंबरणाऱ्या गायी ?

भाई खरंच काय असतो ?
गुंडगिरीचा भाव असतो
दादागिरीचा ठाव असतो
दहशतवादाचं नाव असतो
भरकटलेला गाव असतो
जगणा-याच्या जीवावर
मारलेला ताव असते.

भाई असतो
जन्माची शिरजोरी
सरतही नाही
उरतही नाही !
भाई एक नाव असतं
नसतो तेव्हा
गल्लीतल्या गल्लीत
खळबळलेलं गाव असतं!!

-रमेश ठोंबरे
(प्रा.फ.मुं.शिंदे यांची माफी मागून)
Ramesh Thombre 

1 comment:

  1. मस्तच...!

    पण थांब लेका...
    औरंगाबादला आल्यावर शिंदेसरांच्या समोर बसून हे विडंबन वाचायला लावतो....! ;)

    ReplyDelete