Oct 25, 2011

33 || लाजू नको प्रिये ||


लाजू नको प्रिये
आजच्या या राती
खुलू दे ती प्रीती
योजिलेली || ३ ||

याज साठी केला
होता अट्टहास
गळ्यामध्ये फास
असू ध्यावा || ४ ||

सौंदर्य पीठिका
प्रियेचा तो तीळ
पाहण्याचा काळ
आज आहे || ५ ||

तनुवरी तोच
शोभणार खास
वर्णिलेला भास
शोधतो मी || ४ ||

सापडेना तीळ
किती केला संग
उरले न अंग
शोधण्याचे || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre

Oct 23, 2011

'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिवाळी अंकाचे श्री. फ.मुं.शिंदे च्या हस्ते प्रकाशन


 

 
 
कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो. - फ. मुं. शिंदे

ऑर्कुट-फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात मराठी कवितेचा एक मोठा लेखकवर्ग व वाचकवर्ग घडविणाऱ्या "मराठी कविता समूहा"च्या "कविता विश्व" ह्या ई-पुस्तकाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन आज (दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी) औरंगाबाद येथे ज्येष्ठ कवी श्री. फ. मुं. शिंदे ह्यांच्या शुभहस्ते एका घरगुती सोहळ्यात केले गेले. ह्या अंकात "मराठी कविता समूहा"च्या ऑर्कुट आणि फेसबुक अधिष्ठानांवर गाजलेल्या अनेक कवितांचा समावेश आहे. ह्या उपक्रमाला "वाचन संस्कृतीची एक महत्त्वपूर्ण चळवळ" असे संबोधून फ. मुं. नी "मराठी कविता समूहा"चे कौतुक केले.
"मुक्तछंदातही एक लय असायला हवी, म्हणूनच मुक्तछंद हा सर्वात अवघड काव्यप्रकार आहे. कवितेचा खरेपणा हा तिचा दर्जा असतो." अश्या शब्दात फ. मुं. नी उदयोन्मुख कवींना मार्गदर्शनही केले. फ. मुं. नी सादर केलेल्या त्यांच्या "आई" आणि "मीनाकुमारी" ह्या कवितांनी उपस्थितांना भावविवश केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन औरंगाबादच्या प्रसिद्ध कवयित्री आणि समूहाच्या सक्रीय सदस्या सौ. रंजन कंधारकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी श्री. विश्वनाथ ओक, डॉ. श्रीरंग देशपांडे, श्री. प्रशांत मुळे आणि प्रसिद्ध प्रकाशक श्री. रमेश राऊत आदी मान्यवरही उपस्थित होते."कविता विश्व" च्या ह्या देखण्या अंकाचे ई-मेल द्वारे नि:शुल्क वितरण केले जाणार आहे. सदर ई-पुस्तक मिळण्यासाठी ebooks@marathi-kavita.com ह्या मेल वर संपर्क करावा.
मराठी कविता समूहाचे रणजित पराडकर, सोनम पराडकर आणि रमेश ठोंबरे हे संचालक कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम पराडकर ह्यांच्या गारखेडा येथील घरी पार पडला. 



32 || चढलेली धुंदी ||


चढलेली धुंदी
गाठलेला ज्वर
वेडावलो पार
स्पर्शानेच || १ ||

वेगळीच नशा
प्रिये तुझी आहे
कोण मग पाहे
मदिरेला || २ ||

अडखळे पाय
दूर तुझ्या जाता
सोडवेना आता
बाहुपाश || ३ ||

लागलेच आता
तुझे ते व्यसन
म्हणतील जन
वाया गेला || ४ ||

म्हणताती म्हणो
त्यांना काय ठावे
झिंगताती नवे
ब्र्यांड रोज || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Oct 22, 2011

सांगा कस खेळायचं ? (बोल गाणी मधून)

सांगा कस खेळायचं ?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमचा खेळ
कोणीतरी पाहत असतंच ना?
तास तास - दिवस दिवस
तुम्च्यासाठी देत असतंच ना?
वन-वन करायचं की Six, Four मरायचं
तुम्हीचं ठरवा!

संततधार पावसात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
छत्री घेऊन उभं असतं
पावसासाठी कुढायचं की चेंडूसारखा उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायातले बूट रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
पण क्षणात आभाळाकडे झेप घेतात
हे काय खरं नसतं?
चिखला मध्ये रुतायचा कि आभाळाला भेटायचं
तुम्हीचं ठरवा!

खेळ अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
खेळ अर्धा उरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस खेळयचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा !

- रमेश ठोंबरे
(मंगेश पाडगावकरांची माफी मागून)

Oct 21, 2011

31. || प्रियेच्या मिठीत ||


प्रियेच्या मिठीत
सामावले जग
विचारांचा वेग
मंदावला || १ ||

शांत झाले मन
मिळताच साथ
आता कधी हात
सुटू नये || २ ||

प्रिये माझी भक्ती
तुलाच गे ठाव
मनीचा तू भाव
ओळखीला || ३ ||

भेटलीस मला
धन्य आता झालो
सोम-रस प्यालो
तव ओठी || ४ ||

घोंगावता वात
शांत आता झाला
शरणही आला
तुज प्रती || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

घाबरू नका



कॉलेजातली एक मुलगी
लग्नानंतर भेटली असेल
तेंव्हा जितकी सुंदर होती
त्याहून सुंदर वाटली असेल.

घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

तुम्ही म्हणाल ...
तेंव्हा अशी नव्हती हसत
जरी इतकीच सुंदर
होती दिसत !

घाबरू नका
तेंव्हा तुम्ही शोधलत तिला
आज तीच तुम्हाला शोधत असेल
तेंव्हा चटकन उठली होती,
आज नक्कीच सोबत बसेल.

आहो .... ! हे काही भविष्य नाही
हे हि तरुण्याचच लक्षण आहे ....
ती हि अजून तरुण आहे
हेच यातलं शिक्षण आहे !

ती जवळ आल्यावर
तुम्ही आणखी जवळ याल
तिने बोट दिल्यावर
तुम्ही हात हातात घ्याल !

हात हातात आल्यावर
तुम्ही नक्की हरवून जाल
तिने "पुढे काय म्हटल्यावर"
पुन्हा तुम्ही भानावर याला ..

मग मला विचाराल ...
"आता हे कसलं लक्षण आहे ..?"
मी म्हणेल ....
यात माझं हि अधुरंच शिक्षण आहे !

पण घाबरू नका ...!
हे काही खरं नसतं ...
तुझे-माझे श्वास वगेरे ...
नुसते मनाचे भास वगेरे !
लोक म्हणतील "लागलं पिसं,
वयानुरूप होतं असं ...."

पण घाबरू नका
हे तारुण्याच लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Oct 20, 2011

|| विश्व ची हे घर || .................. ३)


विश्व ची हे घर
शब्दांचे पाझर |
काव्याचे माहेर
हेच आहे ||

शब्द शब्द येतो
आतून तो खोल |
काय त्याचे मोल
वर्णावे मी ||

रोज येथं चाले
काव्याचा जागर |
भरली घागर
ओसंडते ||

शब्द येथं रत्न
शब्द ची रे धन |
गहीवरे मन
वेचताना ||

शब्द शब्द आहे
निपजले अस्त्र |
भरजरी वस्त्र
फिके फिके ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Oct 18, 2011

.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले !



भल्या मोठ्या हत्तीचे तेव्हा शेपूट होते शानदार,
शरीरावानी मोठे आणि थोडे झुपकेदार.
शेपटामुळेच हत्तीची वाढली होती शान,
शेपटामुळेच हत्तीला मिळत असे मान.
आपला मान पाहून एकदा हत्तीला गर्व झाला,
सरळ जावून हत्ती कोल्हयाचे घरटे मोडून आला.
हत्तीच्या शेपटाने कोल्हयाचे घरटे मोडले,
घरट्याच्या छाप्पराने पिलाचे शेपूट तोडले.
पिलाचे शेपूट पाहून कोल्हा दुखी झाला,
हत्तीला धडा शिकवण्याचा त्याने पण केला.
हत्ती होता शक्तिशाली तसाच कोल्हा चतुर,
धडा शिकवण्यास हत्तीला तितकाच झाला आतुर.
....
एका शांत सकाळी कोल्हा नदीवर गेला,
पिलाला पाण्यात बसउन स्वतः दूर झाला.
थोड्याच वेळात स्नानासाठी हत्ती तेथे आला,
पाहून पाण्यात पिलाला तो दंग झाला.
हत्ती म्हणे , 'कोल्होबा पिलू काय करतंय ?
पाण्यात शेपूट सोडून असं काय धरतंय ? '
कोल्हा म्हणे, 'पिलाला आज मासे खाऊ वाटले,
म्हणूनच त्याने पाण्यात शेपूट आहे टाकले.
आता थोड्या वेळात मासे गोळा होतील,
शेपटीला धरून सगळे वर येतील.
मासे म्हणताच हत्तीच्या तोंडाला पाणी सुटले,
त्यानेहि पाण्यात जाऊन शेपूट नदीत टाकले.
थोडा वेळ झाल्यावर हत्ती म्हणे कोल्हयाला,
'आता वर येऊ का फार धुकतंय शेपटीला.'
कोल्हा म्हणे, हत्तीला - ''आणखी थोडा धीर धार,
मग खुशाल शेपूट काढून माशांचा फराळ कर,
- ते बघ माझं पिल्लू कसं शांत बसलंय,
वेदना होत असतानाही पोटासाठी हसतंय.''
थोड्या वेदना वाढल्यावर हत्तीने शेपूट काढले,
पाहतो तर शेपूट होते माशांनी अर्धे तोडले.
पाहून हत्तीचे लांडे शेपूट, लांडे पिल्लू हसले,
म्हणे 'गजराज माझ्या लांड्या शेपटाला फसले'
...
आता शेपूट गेल्यावर हत्तीची अद्दल घडली,
हत्तीच्या गर्वानेच त्याची शेपटी तोडली.
जेव्हा असे माश्यांनी हत्तीचे शेपूट तोडले,
तेव्हा पासून हत्तीने मांस खाणे सोडले.
मांस त्याने सोडल्यावर शेपूट नाही आले.
... अन शेवटी हत्तीचे शेपूट छोटे झाले.
- रमेश ठोंबरे 
 ( Ramesh Thombre)

Oct 17, 2011

असावी - नसावी (कविता)



मस्तीत चालणार
धुंदीत बोलणार
गंधित करणार असावी ... !

गद्यात भेटणार
पद्याने बाटणार
फितूर वाटणार नसावी ... !


काव्याचे अंग
अन रसराज संग
मैफलीत गाजणार असावी ... !

शब्दांच्या ओझ्यात
यमकांच्या बोझ्यात
अर्थाला बुजणार नसावी ... !


छंदाशी खेळणार
गंधाशी भाळणार
मुक्तीत लोळणार असावी ...!

ओळीला ओळ
अन कळेना घोळ
अंत ती पाहणार नसावी ... !


वाचताना छोटी
अन अर्थाला मोठी
सुखद 'अट्याक' असावी ... !

अवघड - बोजड
ज्ञानियाना डोईजड
डोक्याला 'हेड्याक' नसावी ... !


लयीत हसणार
व्रतात बसणार
मनात ठसणार असावी ... !

अलंकाराचे नसणे
वर - वर दिसणे
तालात चुकणार नसावी ... !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Oct 15, 2011

प्रतिसाद



प्रेम म्हणजे काय हे माहित नसतानाच
त्याने तिच्यावर प्रेम केल.
अगदी जिव फेकून ..
आणि र्हदय विकून ...

तीनही प्रतिसाद दिला
उगीच तिरका डोळा केला
तो ही खुश झाला अनं
नकळत जळत गेला,
कारन त्याने ऐकल होत
प्रेम म्हणजे जळत जाण

त्या दिवशी पर्यंत तो खुश होता
तिनं दिलेल्या प्रतिसादावर

पण ... त्या दिवशी तिनं
आणखी एक प्रतिसाद दिला,
त्याच्याच जिवलग मित्राला
अणि खरच तो जळत गेला ..
प्रेम नावाच्या नशे पासून
प्रेम नावाच्या चितेपर्यंत.... !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

~ मोजली नाही कधीही हार मी ~


मोजली नाही कधीही हार मी
घेतली नाही कधी माघार मी

लोटले ज्यांनी रणी या पामरा
मानले त्यांचे पुन्हा आभार मी

पेटला अंगार, झालो राखही
त्यातुनी झालो असा साकार मी

कुंडलीही मांडली आता खरी,
जीवनाला देउ का आकार मी ?

चार जेंव्हा बोलले रे 'चांगला'
आज वाटे व्यर्थ झालो ठार मी.

- रमेश ठोंबरे 
 Ramesh Thombre 

भाई (Vidamban)

भाई
भाई एक
नाव असतं.
शहरातल्या शहरात
गुंडगिरीचं गाव असतं!

सर्वांत असतो तेव्हा
जाणवत नाही.
आणि नसला कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही

खत्रा रंगतो
टाहो उठतात.
बारक्या गल्लीत
उमाळे दाटतात.

भाई गल्लोगल्लीत तसाच
जातो घेऊन काही.
जिवाचं जिवालाच
कळावं असं
आस देऊन काही.

भाई असतो
एक धागा
जगात उजेड पडणारी
दुबईतली जागा.

जग उजळतं तेव्हा
त्याला नसतं भान
विझून गेली प्राणज्योत की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान.

भाई येतात जातात
गल्ली मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान.
दिसत नसलं डोळ्यांना तरी
सापडत गेलो
गल्ली बोळ की,
सापडतेच ती दादागिरीची खाण.

याहून का निराळा असतो भाई ?
तो गल्लीत नाही तर मग
कुणाशी बोलतात गोठ्यात
हंबरणाऱ्या गायी ?

भाई खरंच काय असतो ?
गुंडगिरीचा भाव असतो
दादागिरीचा ठाव असतो
दहशतवादाचं नाव असतो
भरकटलेला गाव असतो
जगणा-याच्या जीवावर
मारलेला ताव असते.

भाई असतो
जन्माची शिरजोरी
सरतही नाही
उरतही नाही !
भाई एक नाव असतं
नसतो तेव्हा
गल्लीतल्या गल्लीत
खळबळलेलं गाव असतं!!

-रमेश ठोंबरे
(प्रा.फ.मुं.शिंदे यांची माफी मागून)
Ramesh Thombre 

~ माझी सासू ~ विडंबन


जागोजागी भेटत असते माझी सासू
कोणाच्याही सासुत दिसते माझी सासू

तिला हवे ते नटणे-बिटणे तरी नेहमी
कजाग, भलती कुरूप दिसते माझी सासू

मला मिळाली किती द्वाड हि सून पहा
मैत्रिणींना सांगत असते माझी सासू

कर्जाचा आज डोंगर थोडा कमी भासतो
कर्ज नवे मग काढत असते माझी सासू

गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो
अवती भवती जेव्हा दिसते माझी सासू

घरी यायला मला जरासा उशीर होता
'पाळत' म्हणुनी जागत बसते माझी सासू

आठवते मग माझी आई मधेच तिजला
जेव्हा माझा उद्धार करते माझी सासू

तिला न्यायला यमराजा रे लवकर ये तू
अल्लड कसली हुल्लड दिसते माझी सासू

- रमेश ठोंबरे

प्रदीप निफाडकर/ पुणे. ("माझी मुलगी") यांची माफी मागून

30 || पाहिला सिनेमा ||


पाहिला सिनेमा
प्रिये सवे एक
तिथे मग मेख
समजली || १ ||

नसतोच कुणी
सिनेमा पाहत
ठेवतो चाहत
सखीवरी || २ ||

थेटरात जेंव्हा
अंधार हा दाटे
प्रिया मग भेटे
बिलगुनी || ३ ||

हवा आहे कुन्हा
चालता सिनेमा
नायकाची तमा
कोण करी ? || ४ ||

संपला सिनेमा
झाला हो उजेड
लागलेची वेड
अंधाराचे || ५ ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Oct 10, 2011

|| सरली रे वर्ष || .................२)




सरली रे वर्ष
आले मी भरास |
घेतला तो ध्यास
कवितेचा ||

एक एक दिन
वाढला रे व्याप |
मग माझा 'बाप'
आनंदला ||

दिसा मागे दिस
मास हि सरले |
वर्ष हि भरले
पूर्ण पाच ||

तेंव्हा हा प्रवास
लागला मार्गास |
काव्याच्या वर्गास
योजलेला ||

नित दिन वाढे
इतिहास, ख्याती |
फुललेली छाती
पहिली मी ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

|| कुठे मम मूळ || .................. १)





कुठे मम मूळ
काय मम कूळ |
जाणता समूळ
तुमी लोकं ||

कशी मी दिसावी
कशी मी असावी |
मायाजाल हेच
घर माझे ||

काय माझं देणं
काय लागे लेणं |
कुणासाठी कोण
आला येथं ||

जन्माचा सोहळा
पहिला रे ज्याने |
केले रे पालन
मनोभावे ||

'म.क.' हेच नाम
दिधले रे मला |
सोहळा तो झाला
यथासांग ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)  - Ramesh Thombre

|| म.क. उवाच ||





माझ्या जन्मापासून इथ पर्यंत ....
बरीच उलथापालथ झाली ....
दररोज, दर-दिवस इतिहास लिहिला जातो ....
कधी गोड, कधी हळवा....
कधी अपेक्षित कधी अनपेक्षित ...
तुम्ही लिहिता ...
तुम्ही बोलता....
तुमचा राग, तुमचा लोभ ....
नेहमीच व्यक्त झाला ....
कधी छंदातून कधी मुक्तछंदातून...
कधी पद्यात कधी गद्यात ....
मी मात्र पाहत असते ....
डोळे लाऊन बसते.
मग मला सुद्धा भरून येतं ....
भर भरून बोलावसं वाटतं
ऐकणार ना ?
....
या मांदीआळीतील......
साद प्रतिसाद .....

-------------- मराठी कविता (म.क.)

Oct 7, 2011

29. || प्रियेचे पाहणे ||

प्रियेचे पाहणे
आहे जीव घेणे
आता एक होणे
बाकी आहे || १ ||

बाहुपाशी तिज
घेण्यास अधीर
नको ना उशीर
प्रेमामध्ये || २ ||

नाजूक ती काया
आसुसली फार
अंगी मग ज्वर
चढलेला || ३ ||

मोहवितो जेथे
सुगंधी गजरा
पदर लाजरा
आड येतो || ४ ||

छळतो हा वारा
आत येतो थेट
खिडकीचे पट
वाजवतो || ५ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Oct 4, 2011

रास रंगला ग सखे रास रंगला



रास रंगला ग सखे रास रंगला
रास रंगला ग सखे रास रंगला
आज प्रीतीचाच जणू 'क्लास' रंगला || धृ ||


तो मुजोर, चित्तचोर वेड लावतो
आणि हास्य मुखावरी गोड दावतो
वाटे 'फासण्याचा' पुन्हा फास रंगला || १ ||


हा असाच वाट पाहे आज दिसाची
रासक्रीडा चाले मग शृंगार रसाची
त्याच साठी आज पुन्हा 'खास रंगला' || २ ||


काय करू कशी खोडू याची सावली
चाले बघ पुन्हा त्याची तीच 'पावली'
पावलीत दांडियाचा 'भास' रंगला || ३ ||


हीच संधी याच्यासाठी हर्षभराची
साठूउन ठेवी याद वर्षभराची
आता संगतीचा जणू त्रास 'रंगला' || ४ ||


रात होता याला फार जोर वाढतो
रात उलटता ताप मग वर चढतो
सरलेच नऊ दिन शेवटचा तास रंगला || ५ ||


हाच सखे माझ्यासाठी जीव टाकतो
चोरूनिया ओळखीचे बाण फेकतो
आज खरा आमचा 'सहवास' रंगला || ६ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Oct 2, 2011

एक महात्मा पाहिजे आहे ! (जाहिरात)





















आमच्यासाठी कष्ठ सोसणारा,
आमच्या सर्व देशाला पोसणारा.
खोट्याच्या दुनियेत सत्याचा आग्रह धरणारा,
आमच्या पोटासाठी स्वतः उपोषण करणारा.
एक महात्मा पाहिजे आहे !

आमच्यासाठी चरख्यावर सुत कातणारा,
आम्हा सर्वाना अहिंसेचा दूत वाटणारा.
जगाला मानवतेचा संदेश देणारा,
सत्य अहिंसा आणि शांतीच गीत गाणारा
एक महात्मा पाहिजे आहे !
.
.
.

पण लक्षात ठेवा .....
देशाच काम फुल-टाईम करावं लागेल,
सांगता येत नाही इथं कोण कसा वागेल.
सत्य सत्य म्हणून खोटच पेरलं जायील,
येणाऱ्या पिकालाहि मग गृहीत धरला जायील.

इथे पावलो पावली लढावं लागेल,
मनालाही कधी कधी गाढावं लागेल.
कधी वाटेल सोडून द्यावी सत्याची वाट,
तेव्हा स्वताच स्वतः च मन मोडावं लागेल.

तुमच्या प्रत्येक गोष्टीत मग काढल्या जातील खोड्या,
शब्दांच्या कसरती अन शब्दांच्या कुरघोड्या.
भेकड, पळकुटा म्हणून हेटाळनीही केली जायील.
तुमच्या नावाची मग सुपारीही दिली जायील,

तुम्ही म्हणाल एवढ करून सुद्धा मरण सस्ते,
पण तुम्ही गेल्यावर तुमच्या नावें होतील रस्ते.
चौका-चौकात तुमचे पुतळे उभारले जातील,
जयंती मयन्तीला सगळे तुमचे गुण गातील.

गेल्यावर हि नेहमीच ....
अपमान हि सहन करावा लागेल,
काळ्या कावळ्याचं तुमच्या काठीशिवाय कस भागेल ?
तुमचे विचार सोडून तुमच सर्व सर्व पळवल जाईल,
एखादा मग तुमचा तो चष्मा हि वरचे वर नेईल.

सरकारी कार्यालयात तुमची व्यवस्था असेल,
सोबतीला मात्र भिंतींशिवाय कुणीच नसेल.
सगळा बाजार समोर दिसेल, पैश्यावरच न्याय असेल
पण तेव्हा तुम्हाला पाहण्या शिवाय पर्याय नसेल.

गेल्यानंतर मागचा विचारच नको,
कोणी मूल्य, कोणी तुमच्या वस्तू विको,
नंतर मागून काहीच बोलायचं नाही..
आतल्या-आतूनही उगाच हलायचं नाही.
गेल्यावर तुमची किंमत ती काय ?
गरज सरो अन वैद्य जाय !


थोडक्यात ...
तुम्हाला सत्य स्वीकारावं लागेल,
देशासाठी खपाव लागेल.
उपोषण आणि सत्याग्रह य्याना शस्त्र म्हणून स्वीकारावं लागेल.
राजकारणाला सहन कराव लागेल,
राजकारण आवडत नसल तरी 'राजकारणी' ...
म्हणलेल एकून घ्यावं लागेल.
तुम्हाला एख्याद्या हि चुकीसाठी माफ केल जाणार नाही ...
(कारण तुम्ही 'महात्मा' असणार आहात ...)
उलट तुमच्यातील दोष हेरले जातील ... !
तुमच्या चांगल्या गोष्टीत हि उणीव असल्याची जाणीव ... (साक्षात्कार)
आम्हाला वेळोवेळी होत राहील.
आम्हाला हव तोपर्यंत तुम्हाला सहन केल जायील....,
नंतर मात्र तुम्हाला संपवण्याची वेळ येयील ... !
तेव्हा तुम्ही गप गुमान 'राम' म्हणायच.

या नंतरच तुमचा खरा सूड आम्ही घेऊ
गेलात म्हणून सोडून कसे देऊ ?
तुमच्यातील उनिवाना उधान येईल ....,
तुमच्या नाकार्तेपणावर संशोधन होईल.
गेलात मेलात ..... संपले असे नाही .... !
दररोज मारले जाल !
.
.
.
.
कबूल असेल तर आजच apply करा,
'महात्म्याची' Post बर्याच दिवसापासून खाली आहे .. !
कृपया Fax किंवा Mail करू नका Online हि भेटू नका ...
प्रत्यक्ष Offline भेटा ......
आम्हाला वर दिलेल्या सर्व Qualities चेक करायच्या आहेत.
आणि काही Policies प्रत्यक्ष ठरायच्या आहेत.


- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre