Nov 6, 2011

माझं साजरं शिवार !



दिस डोयीवर आला,
सारं उजाड उजाड.
पान गळली सगळी,
उभं बोडकंच झाड.

काळ्या काळ्या रानामंदी,
चाले नांगराचा फाळ.
उन तापलं तापलं,
माय सोसतिया झळ.

झाली मशागत आता,
काम पाऊस करील.
त्याचं आगमन होता,
मुठ धान्याची सोडील.

बीज रुजता पोटात,
कूस उजवेल तिची.
कोंभ हिरवा कोवळा,
ओटी सजवेल तिची.

भल्या थोरल्या झाडाची,
भली थोरली सावली.
साऱ्या वावराची चिंता,
येड्या आईला वाहिली.

मोठ बोले कुई कुई,
पाणी वाहे झुळू झुळू.
सोन्या-गुण्याचा संगती,
आलं हाता मंदी बळ.

पाणी पाटामंदी जातं,
त्याची ओळखीची वाट.
पाट जिवलग त्यांचा,
आता सालभर भेट.

पाणी मिळता पिकाले,
गेलं तर्रारून रोप.
आलं वयात शिवार,
कुठं डोळ्या मंदी झोप !

आलं फुल्लारून पिक,
पिक माणिक माणिक.
डोले फुगवून छाती,
दाणा भरलं कणीस.

काळ्या काळ्या धरतीच,
झालं हिरवं वावर.
आलं झोकात फुलून,
माझं साजरं शिवार !


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)

No comments:

Post a Comment