Jul 30, 2011

खून झालाय कवितेचा

खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात,
अल्लड होती, अवखळ होती, या इथेच खेळत होती.

कधी अडकली कळलेच नाही, आखीव रेखीव बंधनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........

इसापनीती, गांधीगिरी, भर-भरून बोलत होती,
कोणीच सोबत नसलं तरी, एकटी एकटी चालत होती.

हरली कशी, फिरली कशी, अस्वस्थ, मनातल्या मनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........

प्रिये सोबत गात होती, सख्या सोबत न्हात होती,
माशालीतली ज्वाला, कधी, समईतली वात होती.

तीळ तीळ तुटतेय, 'शमा' बनून, काचेच्या आवरणात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........

छोट्यान्सोबत रांगत होती, तत्वज्ञान सांगत होती,
तालासुराचं वेड तिला, शहाण्यासारखी वागत होती.

अर्थ तिला गावत नाही, जरी लय तिच्या कानात
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........

उंची तिची बरीच होती, खोली तिची खरीच होती,
उथळ थोडी वाटली तरी, जगण्यासाठी पुरीच होती.

आज थोडी खट्टू झालीय, फिरते उदास वनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment