Jul 30, 2011

१) प्रियेचे श्लोक


भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा


प्रियारंभ आरंभ या जीवनाचा |
प्रियासंग हा ध्यास या पामराचा ||
नमू या प्रियेला उगाळून वाचा |
मनी ध्यास घ्या रे प्रिया ग्रंथ वाचा || १||

प्रभाते प्रभाते प्रिया नाम घ्यावे |
प्रियेच्या जपाने असे धुंद व्हावे ||
मनी जे वसे ते प्रिया संग दावे |
प्रियेचा विना हे असे फोल दावे ||२||

प्रिया हट्ट तो हट्ट मोडू नको रे |
प्रिया नाम सन्मान खोडू नको रे ||
प्रिया काळजा जोड, तोडू नको रे |
सदाचार हा थोर सोडू नको रे ||३||

प्रिया वंद्य ते सर्व भावे करावे |
प्रिया निंद्य ते सर्व सोडून ध्यावे ||
तिच्या नामघोषी मुखाने झिजावे |
तिच्या दर्शनाने उगी का विझावे ? ||४||

प्रिया हात हाती जपावा सजावा ।
जगाचा पसारा जरा दूर ठेवा ||
प्रियेच्या सुखाचा मनी ध्यास घ्यावा |
तिने टाळताची कुठे जीव ध्यावा ? ||५||

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment